विमान प्रवासात गैरवर्तन करणा-यांसाठी कठोर नियम

सरकारने विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणा-यांना मोठा दणका दिला आहे. आता विमान प्रवास करताना कुणी गैरवर्तन केल्यास संबंधीत व्यक्तीला मोठा फटका बसणार आहे.

Updated: Sep 11, 2017, 06:56 PM IST
विमान प्रवासात गैरवर्तन करणा-यांसाठी कठोर नियम title=

नवी दिल्ली : सरकारने विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणा-यांना मोठा दणका दिला आहे. आता विमान प्रवास करताना कुणी गैरवर्तन केल्यास संबंधीत व्यक्तीला मोठा फटका बसणार आहे.

गैरवर्तन करणा-या व्यक्तीला ३ महिने ते आजन्म बंदी घालण्याचा नियम करण्यात आलाय. तर अ‍ॅव्हिएशन रेग्युलेटर डीसीजीए काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या अशा प्रवाशांचा रेकॉर्ड ठेवणार आहे. 

सरकारने विमान प्रवाशांसाठी नवीन नियम तयार केले आहेत. प्रवासादरम्यान गैरवर्तन करणा-या प्रवाशांना आता तीन प्रकारे शिक्षा दिली जाणार आहे. त्यात प्रवाशांवर विविध कालावधीसाठी प्रवास बंदी घालण्यात येणार आहे. विमान प्रवासादरम्यान गेल्या काळात घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत. ज्यात शिवसेना खासदाराचा एअर इंडियाच्या कर्मचा-यासोबतच्या राड्याचाही समावेश आहे. 

हे नवे नियम जुन्या प्रकरणांवर लागू होणार नाही. नव्याने समोर येणा-या प्रकरणांवर ते लागू होतील. हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा एका कार्यक्रमात म्हणाले की, ‘आपला देश जगातला पहिला असा देश आहे, जिथे विमान प्रवासासंबंधी बंधनं घालण्यात आली आहेत’.

आता विमानाचा पायलट विचित्र घटनांचे रिपोर्ट करू शकतील. तर संबंधीत एअरलाईनची एक विभागीय समिती ३० दिवसांच्या आत प्रकरणाची चौकशी करतील. प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रवाशाला प्रवास करण्याची मुभा असेल.