KL Rahul IPL 2025 Auction : सौदी अरेबियाच्या जेद्दाह स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) साठी मेगा ऑक्शन पार पडलं. यात 182 खेळाडूंना फ्रेंचायझींनी तब्बल 640 कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. यात ऋषभ पंतवर लखनऊ सुपरजाएंट्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी लावली आणि त्याला संघाशी जोडलं. ऋषभ पंत हा मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. तर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या ऑक्शनमध्ये लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rhaul) याच्या करता 14 कोटी रुपये खर्च केले.
दिल्ली आणि लखनऊ फ्रेंचायझीने एकमेकांच्या कर्णधारांची अदलाबदल केली. ऋषभ प्रमाणे श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटी तर व्यंकटेश अय्यर करता केकेआरने तब्बल 23.75 कोटी रुपये मोजले. मात्र केएल राहुलवर अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. यांच्या तुलनेत केएल राहुलला अर्ध्या किंमतीत खरेदी करण्यात आले. दिल्ली कॅपिटल्ससह केएल राहुल आता एक नवी सुरुवात करू इच्छितो. याबाबत राहुल आणि दिल्लीचे सहमालक पार्थ जिंदल यांच्यात बातचीत सुद्धा झाली.
आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये केएल राहुलला खरेदी केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची मॅनेजमेंट खुश आहे. ऑक्शननंतर संघाचा सहमालक पार्थ जिंदल आणि केएल राहुल सोबत बोलणं झालं. पार्थ जिंदलने ईएसपीएन क्रिकइंफो सोबत बोलताना म्हंटले की, 'केएल राहुलने संघाकडून 14 कोटीं व्यतिरिक्त आदर मागितला आहे. राहुलला फक्त खेळायचे आहे आणि त्याला फ्रेंचायझीकडून फक्त प्रेम आणि सपोर्ट हवाय. पार्थ जिंदलने म्हटले की, केएल राहुलला संघात आदर हवाय आणि मला विश्वास आहे की तो दिल्लीकडून त्याला मिळेल. राहुल दिल्लीसाठी आयपीएल खेळायला आणि जिंकायला सुद्धा उत्सुक आहे. पार्थ जिंदालशी संवाद साधताना राहुल म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सने कधीही आयपीएल जिंकले नाही आणि मी ही जिंकलेलो नाही, मग ते आपण एकत्रच जिंकूयात'.
हेही वाचा : IPL ऑक्शनमध्ये राहिला Unsold; पठ्ठयानं दुसऱ्याच दिवशी मैदानात काढला राग, पंतचा रेकॉर्ड धुळीस मिळवला
आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्स प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करू न शकल्यामुळे कर्णधार केएल राहुल आणि संघाचे मालक संजीव गोयनका यांच्यात वाद झाला होता. सामन्यानंतर भर मैदानात येऊन संजीव गोयनका यांनी राहुलला खडेबोल सुनावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच ऑक्शनपूर्वी कर्णधार केएल राहुलला संघाने रिटेन सुद्धा केले नाही आणि परिणामी त्याला ऑक्शनमध्ये उतरावे लागले. परंतु आता दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी मोजून केएल राहुलला विकत घेतल्यामुळे केएल राहुलकडेच संघाचं कर्णधारपद सोपवलं जाईल अशी शक्यता आहे.