IMD Forecasts Cyclonic Circulation Over Bay Of Bengal: देशात मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुढील काही दिवसांमध्ये अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण 12 राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओडिशामधील अनेक ठिकाणी फार जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
तेलंगणमध्ये पुढील 3 दिवस कारण नसताना लोकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर भारतामधील डोंगराळ भागांमध्येही पुढील आठवड्याभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा दिल्ली जलमय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील यमुना नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. गंगेमधील पाण्याच्या प्रवाहालाही वेग आला आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशमधील अनेक भागांना येत्या काही दिवसात पुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात अनेकदा उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेनमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला आहे. आजही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बंगलाच्या खाडीमध्ये पश्चिम मध्य आणि नैऋत्येला ही स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ समुद्राच्या पाणी पातळीपासून 5.8 ते 7.6 किमी वर आहे. पुढील 24 तासांमध्ये या स्थितीचं रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमधील याच परिस्थितीमुळे तेलंगण, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्याच्या भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या ठिकाणी 115.6 ते 204.4 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. हिमाचल प्रदेश, राजस्थानच्या पूर्वेकडील भाग, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, मराठवाडा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पॉण्डेचेरीमध्ये 64.5 ते 115.5 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा स्तर 205.45 मीटर इतका आहे. ही पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे. 10 दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा दिल्लीत पूराची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. या दोन्ही नद्या पुढे उत्तर प्रदेशमधील अनेक भागांमधून वाहतात. त्यामुळेच उत्तर प्रदेशला आगामी काही दिवसांमध्ये पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे. यमुनेची उपनदी असलेल्या हिंडन नदीमधील पाणी पातळी वाढल्याने नोएडा, गाझियाबादमधील अनेक परिसर रिकामे करण्यात आले आहेत.