Maharashtra Weather News : देशभरात सध्या ऋतूबदलांचं सत्र सुरू असून, येत्या दिवसांत तापमानात लक्षणीय चढ- उतार होण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे पुढील काही दिवस वादशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, कमाल तापमान 28.8 अंशांदरम्यान राहील. बुधवारीसुद्धा मंगळवारप्रमाणंच तापमानात वाढ कायम राहणार आहे. देशाच्या उत्तर पश्चिमेकडे पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानात बदल होणार असून, इथून देशात वाहणारे वारेही यामुळं प्रभावित होताना दिसणार आहेत.
देशाच्या हवामानात हे बदल होत असतानाच महाराष्ट्राला आतापासूनच उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. राज्यात ब्रह्मपुरी इथं पारा 38 अंशांवर पोहोचल्यामुळं होरपळ वाढली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मुंबई शहर आणि उपनगर या भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होईल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. तर, अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसणार आहेत. सध्या तरी हवामानाचं हे चित्र पाठ सोडणार नसून, येणाऱ्या दर दिवसासमवेत उष्मा वाढतच जाणार आहे. त्यामुळं उकाड्याचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पुरेसं पाणी प्या, सूती कपड्यांचा वापर करा असा सल्लाही नागरिकांना देण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्रीय हवामानास्त्र विभागाच्या वतीनं 19 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरसह, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पूर्वोत्तर भारताला ढगांच्या गडगडाटाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, अरुणाचल प्रदेशातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथं पावसासह जोरदार हिमवृष्टीचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 20 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर, हिमाचल प्रांताला हिमवर्षावाचा तडाखा बसणार असल्यामुळं इथं या दिवसासाठी यलो अर्ट जारी करण्यात आला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे उत्तरेकडे हिमवादळसदृश्य परिस्थिती असूनही वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं देशाच्या उर्वरित भागांवर या स्थितीचा फारसा परिणाम होताना दिसणार नाही.