'महाकुंभ बनला मृत्युकुंभ! मी पवित्र गंगा मातेचा...', ममता बॅनर्जींच्या विधानाने नवा वाद

Mamata Banerjee On Mahakumbh: महाकुंभमेळ्यासंदर्भात पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरुन वाद

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 19, 2025, 09:45 AM IST
'महाकुंभ बनला मृत्युकुंभ! मी पवित्र गंगा मातेचा...', ममता बॅनर्जींच्या विधानाने नवा वाद title=
ममतांच्या विधानाने वाद

Mamata Banerjee On Mahakumbh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासंदर्भात मागील महिन्याभरात दोन वेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच चेंगराचेंगरीवरुन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. ममता यांनी नेमकं काय म्हटलंय आणि हा वाद काय आहे पाहूयात..

दोनदा झाली चेंगराचेंगरी

महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 60 जण जखमी झाले होते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनांबद्दल बोलताना ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महाकुंभचं आयोजन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलं आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरीवरुन योगी सरकारला लक्ष्य करत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाष्य केलं.

 गर्दी नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थाच नसल्याचा आरोप

“महाकुंभ आता मृत्युकुंभ’ बनला आहे.” महाकुंभमेळ्यात व्हीव्हीआयपींना विशेष सुविधा दिल्या जात आहेत, तर सामान्य लोकांना तिथे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे," असा आरोप ममता बॅनर्जींनी यावेळी केला. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवरून त्यांनी योगी सरकारला धारेवर धरताना तेथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालच्या विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी, “हा ‘मृत्युकुंभ’ आहे. मी महाकुंभचा आदर करते, मी पवित्र गंगा मातेचा आदर करते पण तिथे कोणतीही व्यवस्था नाही. श्रीमंत, व्हीआयपींसाठी एक लाख रुपयांपर्यंतच्या तंबूंची तरतूद आहे. मात्र, गरिबांसाठी कुंभमेळ्यात कोणतीही व्यवस्था नाही. मेळ्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती होणे सामान्य आहे, पण हे होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. हे रोखण्यासाठी तुम्ही काय योजना आखल्या?” असा सवाल उपस्थित केला आहे.

पुन्हा एकदा तृणमूल आणि भाजपा आमने-सामने

ममता बॅनर्जींनी केलेल्या टीकेवरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. पश्चिम बंगाल भाजपाने या वक्तव्याचा निषेध करताना मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हिंदुंच्या भावना दुखावल्या असल्याचा दावा केला आहे. या विधानावरुन आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालामध्ये तृणमूल आणि भाजपा असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.