Chhaava: विकी कौशलचा 'छावा' मराठीत प्रदर्शित होणार?

Chhaava In Marathi: विकी कौशलचा छावा चित्रपटात मराठीत येणार, मंत्री उदय सामंत यांनीच तसे संकेत दिले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 19, 2025, 09:22 AM IST
Chhaava: विकी कौशलचा 'छावा' मराठीत प्रदर्शित होणार?  title=
vicky kaushal chhaava will be dubbed in marathi and released

Chhaava In Marathi: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' हा चित्रपट संपूर्ण देशभरात गाजतो आहे. एका आठवड्यातच सिनेमाने 100 कोटींचा पल्ला गाठला आहे. अजूनही सिनेमाची घोडदौड सुरूच आहे. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंधाना या सिनेमात संभाजीराजे आणि येसूबाईंची भूमिका साकारत आहेत. 'छावा' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण लवकरच छावा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होऊ शकतो, तसे संकेतच मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

लक्ष्मण उतेकर यांनी छावा सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अवघ्या तीन दिवसांतच 100 कोटींचा गल्ला सिनेमाने पार केला आहे. छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उदय सामंत यांनी अलीकडेच दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची भेट घेतली आहे. यावेळी मनसे नेते अमेय खोपकरदेखील उपस्थित होते. 

उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. "छावा"  चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर  उपस्थित होते. उदय सामंत यांच्या ट्विटनंतर छावा मराठी भाषेत प्रदर्शित झाल्यास या चित्रपटालाही भरभरून प्रतिसाद मिळेल, यात काही शंका नाही. 

'छावा'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

छावा चित्रपटाने पहिल्या सोमवारी 24  कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे तो या वर्षाच्या पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने 31 कोटींची सुरुवात केली आणि रविवारी 48.5 कोटींची कमाई केली. एकूणच, या चित्रपटाने 140.50 कोटी रुपये कमावले आहेत. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने सुमारे 170 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहता, तो 500 कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करेल हे स्पष्ट दिसते.

विकी कौशल आज रायगडावर जाणार

शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात किल्ले रायगडावरून होत आहे. सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा विकी कौशल या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.