Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'

Chhaava Movie BTS Video : ...आणि लक्ष्मण उतेरकर म्हणाले, 'मला माझा छावा भेटला'; 2 मिनिट 31 सेकंदांच्या व्हिडीओतून पाहा विकी कौशल छावा चित्रपटासाठी नेमका कसा तयार झाला. पडद्यामागच्या कलाकारांचीही तितकीच मेहनत...   

सायली पाटील | Updated: Feb 19, 2025, 09:22 AM IST
Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा' title=
Vicky Kaushal Chhaava movies BTS video of Making of a Warrior King will give you goosebumps

Chhaava Movie BTS Video : हिंदी कलाविश्वामध्ये सध्या एकाच नावाची आणि एकाच कलाकृतीची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट म्हणजे 'छावा'. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशल याला रुपेरी पडद्यावर प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि या अभिनेत्यानं त्या भूमिकेला जीव ओतून न्याय देण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता विकीचा हा प्रयत्न खऱ्या अर्थानं यशस्वी ठरला असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

प्रदर्शित झाल्या क्षणापासून या चित्रपटानं कमाल कामगिरी केली आणि  यातील प्रत्येक दृश्य चाहत्यांच्या मनात घर करून गेलं. याच चित्रपटातील प्रत्येक दृश्य हे फक्त पडद्यावर दिसणारे कलाकारच नव्हे, तर पडद्यामागं असणाऱ्या कैक कलाकारांनी साकारलं आहे, त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. याच मेहनतीवर प्रकाश टाकत 'छावा' साकारण्यासाठीची तयारी नेमकी कशा पद्धतीनं करण्यात आली, याची झलक दाखवणारा एक व्हिडीओसुद्धा नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

अवघ्या 2 मिनिटं आणि 31 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये सेटवर चित्रीकरणादरम्यान नेमकं कसं चित्र आहे याची झलक पाहायला मिळत आहे. 'चित्रपटासाठी आम्ही प्रचंड प्रशिक्षण घेतलं. घोडेस्वारी, शस्त्र प्रशिक्षण, लाठीकाठी, तलवारी, दांडपट्टा या साऱ्याचं प्रशिक्षण घेतलं. दर दिवशी किमान 6 ते 8 तासांचं प्रशिक्षण सुरु होतं. दर दिवशी मी घरी परत यायचो तेव्हा माझ्या शरीरावर एक नवी जखम होती', असं विकी म्हणाला. या प्रशिक्षणानं माझ्या जीवनाला एक प्रकारची शिस्त लागली ही बाबही त्यानं अधोरेखित केली. 

हेसुद्धा वाचा : Chhaava: विकी कौशलचा 'छावा' मराठीत प्रदर्शित होणार?

फक्त साहसदृश्यांसाठीचं प्रशिक्षण नव्हे, तर संभाजी महाराजांची देहबोली साकारण्यासाठीसुद्धा विकी कौशलनं बरीच मेहनत घेतली. त्यासाठी त्याच्या आहाराच्या सवयींपासून व्यायामामध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबत अॅक्शन डिरेक्टर, साईड अॅक्टर, ज्युनिअर आर्टीस्ट यांच्यासह सेटवर असणाऱ्या प्रत्येकानच या चित्रपटाच्या उभारणीत मोलाचा हातभार लावला आणि प्रेक्षकांच्या भेटीला आरा, गर्जना करणारा 'छावा'.