नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसने साऱ्या जगभरात थैमान घातलेलं असतानाच देशातही यामुळे चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. दर दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या कोरोनाच्या या वातावरणात आणखी एक चिंता वाढवणारी बाब म्हणजे या विषाणूचासंसर्ग होऊऩ जीव गमवावा लागलेल्यांची संख्या ही एक हजारांपास पोहोचली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १००७ वर पोहोचली आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली.
साधारण दीड महिन्याहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन लागू असूनही अशा परिस्थितीत कोरोना बाधितांचा आकडा ३१,३३२ वर पोहोचला आहे. ज्यापैकी ७६९५ जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यात एक स्थलांतरित रुग्णाचाही समावेश आहे.
73 deaths and 1897 new cases in last 24 hours due to #Coronavirus, the sharpest ever increase in death cases in India. https://t.co/5PP3jVpzaj
— ANI (@ANI) April 29, 2020
मागील चोवीस तासांमध्ये देशभरातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहिली तर, या जीवघेण्या संसर्गामुळे ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १८९७ नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधित वाढ असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी भारतात कोरोनाचा विस्तार आणखी वेगाने झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या धर्तीवर आता प्रत्येक राज्याकडून कोरोनाशी लढण्यासाठी काही कठोर पावलं उचलली जात आहेत. लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करणं असो किंवा कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं असो, प्रत्येक बाबतीत कोरोनावर मात करण्यासाठीचेच प्रयत्न सुरु आहेत.