रस्त्यावर चाट विकणारा करोडपती, आयकर विभागासमोर १.२० करोड सरेंडर

दोन वर्षांपासून मालकानं आयकर परतावा दाखल केलेला नाही

Updated: Oct 19, 2018, 02:59 PM IST
रस्त्यावर चाट विकणारा करोडपती, आयकर विभागासमोर १.२० करोड सरेंडर

लुधियाना : आयकर विभागाच्या छापेमारीनंतर पंजाबच्या पटियाला शहरातील फोकल पॉईंटस्थित 'रिंकू चाट'नं १ करोड २० लाख रुपये आयकर विभागासमोर सरेंडर केलेत. कागदपत्रांच्या चौकशीनंतर या चाट दुकानाचा मालक मनोज यानं १.२० करोड रुपये सादर केले. सूत्रांच्या माहितीनुसार, 'रिंकू चाट वर्ल्ड'कडून अद्याप कोणत्याही पद्धतीचा आयकर परतावा फाईल केला गेलेला नव्हता. 

यापूर्वी, लुधियानाच्या ''पन्नू पकोडे'वाल्यानं आयकर विभागाच्या कारवाईत ६० लाख रुपये सरेंडर केले होते... त्यानंतर याची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती. 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, 'रिंकू चाट'नं दोन पार्टी हॉल बनवले होते... एखाद्या समारंभात चाट पुरवण्यासाठी तो अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत किंमत वसूल करत होता. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्स चोरीची रक्कम आणखीन वाढू शकते कारण खरेदी विक्रीचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आलेला नाही. दोन वर्षांपासून मालकानं आयकर परतावा दाखल केलेला नाही. 

हा चाटवाला कॅटररचंही काम करतो. अघोषित मिळकतीचा खुलासा केल्यानंतर आता या चाटवाल्याला ५२ लाख रुपयांचा टॅक्स भरायचा आहे. आयकर विभागाच्या टीमनं बुधवारपासून त्याच्या मिळकतीचा सर्व्हे सुरू केला होता. पटियालामध्ये त्याचे दोन कारखानेही आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज करोडोंमध्ये कमावणारा 'रिंकू चाट वर्ल्ड'चा मालक मनोज वर्ष-२००० पूर्वी चाट बनवण्याचा कामगार म्हणून काम करत होता. त्यानंतर त्यानं स्वत:च दुकान खोलून आपला व्यवसाय सुरू केला होता.