तेलंगणातील हणमकोंडा येथे वर्दळीच्या रस्त्यावर एका व्यक्तीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हत्या घडली तेव्हा रस्यावर लोकांची गर्दी होती. या सर्वांच्या डोळ्यांदेखत ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे हल्ला होत असताना कोणीही हस्तक्षेप केला नाही. दरम्यान हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचं नाव वेंकटेश्वरुलु आहे, जो एक ऑटोरिक्षा चालक आहे. त्याने बळी राज कुमारचा पाठलाग करून त्याला ठार मारले.
रस्त्यात जेव्हा रिक्षाचालक दुसऱ्या व्यक्तीची हत्या करत होती, तेव्हा तिथे उपस्थित गर्दी मदत करण्याचं सोडून आपल्या मोबाईलवर ही घटना रेकॉर्ड करण्यात व्यग्र होती. पांढरा शर्ट घातलेला आरोपी गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीचा पाठलाग करताना व्हिडीओत दिसत आहे. यानंतर तो रिक्षा एका ठिकाणी थांबवून धारदार शस्त्रं काढून धमकावू लागतो.
राज कुमार आपल्यावरील हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना वेंकटेश्वरुलु त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करतो. इतर लोक ही घटना पाहत असताना, हिरवा शर्ट घातलेला एक जण आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि आरोपीने एकामागून एक वार केले.
आरोपीने त्याच्या रिक्षातून पळून जाण्याचा प्रयत्न करताच, लोक पुढे आले आणि त्यांनी गाडी एका बाजूला वळवली, ज्यामुळे तो आत अडकला. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच गर्दी त्याला पकडते आणि मारहाण करते. यानंतर काही वेळाने पोलीस तिथे येऊन त्याला अटक करतात. पोलिसांनी सांगितलं की जर लोकांनी हस्तक्षेप केला असता तर हा गुन्हा घडला नसता. दरम्यान या हत्येमागे नेमकं काय कारण होतं हे स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.