नवी दिल्ली : वाढत्या इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. मात्र, ही कपात खूपच किरकोळ असल्याचं दिसत आहे. पाहूयात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती कपात झाली आहे आणि काय आहेत सध्याचे दर...
गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत होती. या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न तेल कंपन्यांकडून होत आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. मात्र, ही कपात आहे की चेष्टा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पेट्रोलच्या किमतीत ७ पैशांनी आणि डिझेलच्या किमतीत ५ पैशांनी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक-एक पैशानी कपात करण्यात आली आहे. म्हणजेच सलग १५ दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीनंतर आता १६व्या आणि १७व्या दिवशी इंधन दरात किरकोळ कपात करण्यात आली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरत आंदोलन करत आहेत. तसेच केंद्र सरकारकडूनही दरवाढ रोखण्यासाठी आणि इंधनाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.