नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि आम्ही एकदिवस त्यावर प्रत्यक्ष ताबा मिळवू, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केले. मोदी सरकारने नुकताच १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून, एक दिवस हा प्रदेश भारताच्या भौतिक अधिकारक्षेत्राखाली येईल, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर सीमेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच आहे. त्यामुळे कलम ३७० हा द्विपक्षीय मुद्दा नाही तर अंतर्गत मुद्दा असल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.
आमची पाकव्याप्त काश्मीरविषयीची भूमिका पूर्वी, आज आणि भविष्यातही स्पष्ट राहिली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. काश्मीरविषयी लोक काय म्हणतील, यावर एका मर्यादेपलीकडे जास्त विचार करण्याची गरज नाही. काश्मीरविषयी अधिकच प्रचार झाला आणि भविष्यातही होईल. पण त्यामुळे स्थिती बदलणार नाही, हे सन १९७२पासूनच स्पष्ट झाल्याचेही एस.जयशंकर यांनी ठणकावून सांगितले.
EAM S. Jaishankar: PoK (Pakistan Occupied Kashmir) is a part of India and we expect one day we will have physical jurisdiction over it. pic.twitter.com/9XUVAbnVor
— ANI (@ANI) September 17, 2019
पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून एस. जयशंकर यांचे समर्थन
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या पाकव्याप्त काश्मीरसंबंधी केलेल्या विधानावर भारतातून तसंच पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतातल्या नेत्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. तर पाकिस्ताननेच काश्मीरचा प्रदेश बळकावला असून, काश्मीर हा पुर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे पाकिस्तानमधल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच भारत हे अपूर्ण कार्य पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवी असल्याची इच्छा, पाकिस्तानातल्या पश्तनूच्या गटाने केली आहे.