बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श केल्याने राजकीय रणनितीका प्रशांत किशोर यांनी संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले होते. आपण सत्तेत कायम राहावं यासाठी नितीश कुमार यांनी कृत्य केल्याची टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे. प्रशांत किशोर सध्या 'जन सूरज' मोहिमेत सहभागी असून भागलपूर येथे लोकांना संबोधित करताना ही टीका केली.
"लोक मला विचारत आहेत की, मी त्यांच्यासोबत भूतकाळात काम केलेलं असतानही त्यांच्यावर टीका का करत आह. पण पूर्वीचे नितीश कुमार आणि आताचे यांच्यात बदल झाला आहे. त्यांच्यातील विवेकबुद्धी आता कमी होत चाललली आहे," अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांनी 2015 मध्ये नितीश कुमार यांच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळली होती. यानंत दोन वर्षांनी पक्षात प्रवेश केला होता.
"एखाद्या राज्याचा नेता हा तेथील जनतेचा अभिमान असतो. पण नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली," अशी टीका त्यांनी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीचा उल्लेख करत केली आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने लोकसभा निवडणुकीत 12 जागा जिंकल्या आहेत. बहुमत न मिळवू शकलेल्या भाजपासाठी तो दुसरा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.
प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत पुनरागमन करण्यात नितीश कुमार यांची महत्त्वाची भूमिका असल्याबद्दल खूप चर्चा होत आहे. पण बिहारचे मुख्यमंत्री त्यांच्या पदाचा कसा उपयोग करुन घेत आहेत? ते राज्याच्या भल्यासाठी आपला प्रभाव वापरताना दिसत नाहीत. पाया पडून ते आपण भाजपाच्या पाठिंब्याने 2025 विधानसभा निवडणुकीनंतरही सत्तेत राहू याची खातरजमा करताना दिसत आहेत".
विशेष म्हणजे, 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम यशस्वीपणे हाताळल्यानंतर प्रशांत किशोर यांना प्रसिद्धी मिळाली होती. 2021 मध्ये त्यांनी राजकीय रणनीती आखणं सोडलं. तोपर्यंत त्यांनी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि जगन मोहन रेड्डी यांच्यासह अनेक मोठ्या राजकारण्यांसाठी काम केलं होते.