नवी दिल्ली : रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत असलेल्या ७ वर्षांच्या प्रद्युम्नची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याच शाळेत ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हा आरोप सुरुवातीला शाळेच्या बस कंडक्टर अशोक कुमार याच्यावर होता.
सीबीआयच्या तपासावर विश्वास असणारे प्रद्युम्नचे वडिल या प्रकरणी बस कंडक्टर पकडला जाईल, याबद्दल साशंक होते. त्यामुळेच त्यांनी सीबीआयकडे तपासाची मागणी केली आणि आता त्यांच्या तपासावर ते संतुष्ट आहेत. त्याबद्दल ते म्हणाले की, "या १६ वर्षाच्या बाल गुन्हेगाराविरोधात केस केली जाईल. अशा प्रकारच्या घटनांचे मूळ हे गुन्हेगारी प्रवृत्तीत आहे."
त्याचबरोबर ते म्हणाले की, "सीबीआयच्या तपासावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या तपासातून जर या मुलाचे नाव पुढे आले आहे. तर नक्कीच त्याच्याकडे काहीतरी पुरावा असणार." त्याचबरोबर प्रद्युम्नच्या आई, सुषमा ठाकूर यांनी सांगितले की, तपास चालू असून पुढे काय होईल हे पाहायला हवे. लोकांच्या विश्वासाला सीबीआय पात्र ठरली. आम्हाला ही खऱ्या खुन्याचा शोध घ्यायचा होता. त्याचबरोबर त्याचे त्यामागील उद्देश जाणून घ्यायचे होते. कारण आम्हाला पोलिसांचा तपास सुरुवातीपासूनच पटत नव्हता. म्हणूनच आम्ही सीबीआयकडे तपासाची मागणी केली.
११ वीत शिकणाऱ्या आरोपी मुलाला घेऊन सीबीआय मुख्यालयात पोहचली. तेथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर सीबीआय तपासासाठी घटनास्थळी देखील जाऊ शकते. काल जुवेनाइल जस्टिस बोर्डाने आरोपीला ३ दिवसांसाठी सीबीआय रिमांड पाठवण्याचे आदेश दिले होते.
आरोपी विद्यार्थ्याने परीक्षा टाळण्यासाठी खून केल्याचा दावा सीबीआयने यापूर्वी केला होता. हा विद्यार्थी पालक सभा देखील पुढे ढकलू इच्छित होता. म्हणून त्या दिवशी हा विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत गेला होता. प्रद्युम्नची हत्या केल्यानंतर आरोपीने चाकू फ्लॅश केला. सीबीआयच्या नुसार ही हत्या पूर्वनियोजित नव्हती. मात्र या विद्ययार्थ्याला असे काही करायचे होते ज्यामुळे परीक्षा रद्द केली जाईल. त्यामुळे टॉयलेटमध्ये प्रद्युम्न दिसताच त्याची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर आरोपी कंडक्टर विरुद्ध कोणतेही पुरावे न मिळाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.