अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : इस्त्रोच्या महत्वकांक्षी चांद्रयान -2 मोहिमेची तयारी आता पूर्ण झाली आहे. रॉकेटमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान -२ अवकाशात झेपावेल. जीएसएलव्ही मार्क 3 एम हे तब्बल 690 टन वजनाचे रॉकेट चांद्रयान -2 ला आपल्या कवेत घेऊन उड्डाणासाठी सज्ज झालं आहे.
चांद्रयान- २ चं एकूण वजन हे ३ हजार ८७७ किलोग्रॅम आहे. या यानाची निर्मिती आधी रशियाच्या सहाय्याने करायची होती. मात्र रशियाने ऐनवेळी अंग काढून घेतल्यानं चांद्रयान-२ ची निर्मिती स्बबळावर करण्यात आली आहे. चांद्रयान -२ चे एकूण ३ प्रमुख भाग आहेत. चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर, चंद्रावर उतरणारा लँडर आणि चांद्रभूमीवर संचार करणारा रोव्हर. या तीन भागांवर एकूण १३ वैज्ञानिक उपकरणं आहेत. त्यांची निर्मिती इस्रोनेच केली आहे.
चांद्रयान- २ चा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. जिथे आत्तापर्यत कोणताही देश उतरलेला नाही. लँडर हा चांद्रभुमीवर अलगद उतरेल तेव्हा चंद्रावर soft landing करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
चांद्रयान २ हे पृथ्वीपासून १७० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केलं जाईल. त्यानंतर हे यान पृथ्वीभोवती १७० किलोमीटर बाय ४० हजार ४०० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. पृथ्वीला प्रत्येक प्रदक्षिणा घालताना चांद्रयान -२ ची कक्षा वाढवत नेली जाईल आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यात चांद्रयान - २ हे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तिथेही सुरुवातीला लंबवुर्तळाकार कक्षेत चंद्राभोवती फेऱ्या मारल्यावर १०० किलोमीटर बाय १०० किलोमीटर या कक्षेत चांद्रयान -२ स्थिरावेल.
मग या यानातून लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुमारे १५ मिनीटांचा प्रवास करत अलगद उतरेल. या लँडरच्या पोटातून रोव्हर बाहेर पडेल आणि चांद्रभूमीवर मुक्त संचार करु लागेल. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरवरील विविध उपकरणांमुळे चंद्राबद्दल विविध माहिती मिळायला सुरुवात होईल.
चंद्राच्या बाबतील आत्तापर्यंत अनेक संशोधन मोहिमा पार पाडल्या असल्या तरी इस्त्रोच्या २००८ मधील चांद्रयान १ मोहिमेत चंद्रावर पृष्ठभागाखाली पाणी असल्याचं सिद्ध झालं होतं. तेव्हा आता चांद्रयान - २ मोहिमेत कोणता वेगळा शोध लागतो, चंद्राबद्दची आणखी कोणती वेगळी माहिती समोर येते याची उत्सुकता आहे.