पुलवामात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेल्या बसमधील जवानांच्या नावांची संपूर्ण यादी

हल्ल्याला बळी पडलेली बस ही सीआरपीएफच्या बटालियन ७६ ची होती

Updated: Feb 15, 2019, 02:47 PM IST
पुलवामात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेल्या बसमधील जवानांच्या नावांची संपूर्ण यादी  title=

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा भागात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. श्रीनगरपासून अवघ्या ३० किलोमीटर दूर अंतरावर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी या ताफ्यावर पहिल्यांदा गोळीबार केला. त्यानंतर स्फोटकांनी भरलेली एक 'एसयूव्ही' गाडी जवानांच्या एका बसवर धडकली... आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात सीआरपीएफच्या एका बसचे आणि त्यातून प्रवास करणाऱ्या जवानांचे अक्षरश: तुकडे-तुकडे उडाले. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटकांचा वापर केला होता. सीआरपीएफचा ताफा जात असलेल्या मार्गावर एका कारमध्ये ही स्फोटके भरून ठेवण्यात आली होते. या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झालेत. हा आत्मघातकी हल्ला जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यानं घडवून आणला. धक्कादायक म्हणजे, आदिल हा अवघ्या २१ वर्षाचा तरुण काश्मीरचा स्थानिक रहिवासी होता. 

सेनेच्या ताफ्यात (convoy) ७८ वाहनांचा समावेश होता. यामध्ये तब्बल २५०० जवान प्रवास करत होते. परंतु, हल्ल्याला बळी पडलेली बस ही सीआरपीएफच्या बटालियन ७६ ची होती. एचआर ४९ एफ ०६३७ क्रमांकाच्या या बसमधून हेड कॉन्स्टेबल आणि ट्रेडसमन रँकचे जवान प्रवास करत होते, अशी माहिती समोर येतेय. हे सर्व सीआरपीएफच्या २१, ३५, ४५, ६१, ७५, ७६, ८२, ९२, ९८, ११५, ११८ आणि १७६ व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेली ही बस ५५ सीटांची होती... त्यातून ४४ जवान प्रवास करत होते. हे सर्व जवान सुट्टया संपवून ड्युटीवर तैनात होण्यासाठी श्रीनगरकडे जात होते. 


जवानांच्या नावांची संपूर्ण यादी

महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बुलडाण्याचे दोन जवान शहीद झालेत. लोणार तालुक्यातल्या चोरपांगरामधल्या नितीन राठोड आणि मलकापूरच्या संजय राजपूत यांना हौतात्म्य आलंय. मलकापूरमधील संजय राजपूत हे सीआरपीएफ बटालियन ११५ मध्ये कार्यरत होते.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं तसंच चार भाऊ आणि एक बहीण असं कुटुंब आहे. वयाच्या २३ व्या वर्षी सीआरपीएफ मध्ये नोकरीला लागलेले संजय राजपूत यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे होती. शहीद संजय राजपूत यांची सीआरपीएफमध्ये २० वर्ष सेवा झाली. मात्र, देशसेवेसाठी त्यांनी परत पाच वर्ष वाढवून घेतली होती. त्यांना वीरमरण आल्यामुळे, राजपूत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.  तर लोणार तालुक्यातल्या चोरपांगरामधल्या नितीन राठोड यांना हौतात्म्य आलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई-वडील, भाऊ-बहिणी असं कुटुंब आहे. नितीन राठोड शहीद झाल्यानं त्यांच्या लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा गावावर शोककळा पसरलीय.