Ratan Tata Net Worth: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. टाटांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. आयुष्यभर कमावलेली हजारो कोटींची संपत्ती टाटा मागे ठेवून गेले. टाटा ग्रुपला उत्तराधिकारी तर मिळाला मात्र रतन टाटांची हजारो कोटींच्या संपत्तीचा वारस कोण, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रतन टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या जवळच्या व्यक्तींची नावं लिहलं असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या अखेरच्या दिवसांत कायम सोबत असणाऱ्या शांतनू नायडूलाची उल्लेख करण्यात आलं आहे. तसंच, त्यांचे पाळीव श्वान यांचीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
रतन टाटांची संपत्ती जवळपास 10 हजार कोटींची असल्याची शक्यता आहे. टाटांच्या संपत्तीमधील काही हिस्सा त्यांनी त्यांचा जर्मन शेफर्ड श्वान टिटोसाठीदेखील ठेवला आहे. जोपर्यंत टिटोची आयुष्यभर काळजी घेण्यात यावी, असं लिहून ठेवण्यात आलं आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी टिटोला त्यांनी दत्तक घेतलं होतं. इतकंच नव्हे तर, टाटांच्या मृत्यूपत्रात त्यांच्यघरी काम करणारा कुकु राजन शॉ आणि जवळपास 30 वर्षांपासून बटलर म्हणून काम करणाऱ्या सुब्बियाहसाठीही संपत्तीचा काही हिस्सा ठेवण्यात आला आहे. घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचारही टाटांनी केला आहे.
टाटा ग्रुपच्या विभिन्न कंपन्यांमध्ये टाटांचे शेअर्स आहेत. तसंच, काही कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारीदेखील आहे. त्या व्यतिरिक्त बंगला, कार आणि अन्य संपत्तीदेखील त्यांच्या नावे आहेत. या सगळ्याचा उल्लेख त्यांच्या मृत्यूपत्रात आहे. तर, कोणाला किती संपत्ती मिळणार याबाबतही स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटलं आहे. इकोनॉमिक टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
टाटा ग्रुपच्या परंपरेप्रमाणे रतन टाटांच्या हिस्सेदारी रतन टाटा एंडोमेंट फांउडेशन (RTEF)ला ट्रान्सफर केली जाईल. टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन आरटीईएफचे अध्यक्षपदी राहू शकतात.
कुलाबामधील हलेकाऊ हाऊस जिथे रतन टाटा यांचे वास्तव्य होते. त्याची मालकी टाटासन्सची उपकंपनी Evart Investments कडे आहे. त्यामुळं या बंगल्याचे पुढे काय करायचं हे ही कंपनी ठरवणार आहे. रतन टाटांचे हलेकाई हाऊस आणि अलिबाग येथील बंगला ही दोन्ही घरं या कंपनीने डिझाइन केली होती. मात्र, टाटांच्या अलिबाग येथील मालमत्तेबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबईच्या जुहू किनारी असलेले घर रतन टाटा आणि त्यांचं कुटुंब भाऊ जिमी, सावत्र भाऊ नोएल टाटा आणि सावत्र आई सिमोन टाटा यांना मिळालं होतं. नवल टाटांच्या मृत्यूनंतर हे घर त्यांच्या कुटुंबीयांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कित्येक वर्षांपासून ते घर विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी 20 वर्षाहून जास्त काळ ते घर बंद आहे.
टाटा सन्सच्या शेअर्सव्यतिरिक्त टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या कंपन्यामध्ये रतन टाटाची भागीदारी आहे. ही भागीदारी RTEFमध्ये हस्तांतरित केली जाणारी आहे. RTEF नॉन प्रोफिटेबल संस्था असून 2022 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. रतन टाटांकडे 20-30 कारचे कलेक्शन आहे. सध्या या कार हेलेकाई निवास आणि कुलाब्यातील ताज वेल लिंग्टन म्यूज सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. भविष्यात या कार कलेक्शन पुणे संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येऊ शकतात.
रतन टाटांच्या मृत्यूपत्रात कार्यकारी सहाय्यक शांतनू नायडुचेदेखील नाव आहे. रतन टाटा यांनी नायडुच्या स्टार्टअप गुडफेल या संस्थेच्या संपत्तीतील हक्क सोडला आहे. तसंच, शांतनुने परदेशातील शिक्षणासाठी घेतलेले कर्जदेखील माफ केले आहे.