नवी दिल्ली : एरिक्सन कंपनीला ५५० कोटी रुपये न चुकविता आल्यानं न्यायालयीन कारवाईसाठी बुधवारी रिलायन्स कम्युनिकेशनचे संचालक अनिल अंबानी सर्वोच्च न्यायालयासमोर हजर झाले होते. पण, या सुनावणीपूर्वीच अनिल अंबानींना घाम फुटला होता. कोर्टात एअर कंडीशन सुरू नसल्यानं त्यांची ही अवस्था झाली होती. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच ते कोर्टरुममध्ये दाखल झाले होते. यावेळी नेहमीप्रमाणेच ते सूट-बूट आणि टाय अशा पेहरावात दिसले...
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अंबानी सकाळी १० वाजताच सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट, काळा सूट आणि टाय असा पेहराव केला होता. ओळखीच्या लोकांशी हसतमुखानं भेटी घेत ते न्यायालयात दाखल झाले... आणि मागच्या रांगेत बसलेल्या रिलायन्स टेलिकॉमचे अध्यक्ष सतीश सेठ यांच्या बाजुला जाऊन बसले.
काही वेळातच अनिल अंबानी घामानं डबडबले... आणि त्यांनी 'एसी बंद आहे का?' असा प्रश्न आपल्या वकिलांना विचारला. यावर, 'कोर्टाच्या नियमानुसार, केवळ मार्च महिन्यात एसी चालवता येतो' अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर मात्र अंबानी यांनी आपल्या कपाळावरचा घाम पुसण्यासाठी रुमाल बाहेर काढला.
त्यानंतर थोड्याच वेळात न्यायमूर्ती आर एफ नरीमन आणि विनीत सरन तिथे कोर्टरुममध्ये झाले. त्यांच्या सन्मानार्थ सगळ्यांप्रमाणेच अंबानीही उभे राहिले.
उल्लेखनीय म्हणजे, टू जी घोटाळा प्रकरणात २०१३ साली पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर झाल्यानंतर अंबानींनी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावली. यापूर्वी २००९ साली रिलायन्स इंडस्ट्रीजविरुद्ध (मुकेश अंबानी यांची कंपनी) कृष्णा - गोदावरी भसीन गॅस प्रकरणात ते सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहिले होते.
कोर्टाची सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होईल आणि त्या सुनावणीसाठी अंबानी यांना हजर राहण्याचे आदेश दिले.