सलमान खानला अखेर जामीन मंजूर

काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामिनावर आज सुनावणी झाली.

shailesh musale Updated: Apr 7, 2018, 03:41 PM IST
 सलमान खानला अखेर जामीन मंजूर title=

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामिनावर आज सुनावणी झाली. सुनावणीवर निर्णय देताना सलमानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सलमानला यापूर्वी जामीन नाकारला  होता. गेल्या २ दिवसांपासून सलमानचा मुक्काम जेलमध्ये आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश रविंद्र कुमार जोशी यांनी प्रकरणावर सुनावणी केली. कोर्टात सलमानची केस 15वी होती, पण ती पहिल्या क्रमाकांवर घेण्यात आली. सुनावणी आधी न्‍यायाधीश रविंद्र कुमार जोशी आणि सलमानला शिक्षा सुनावणारे सीजेएम देव कुमार खत्री यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली होती.

सलमानच्या बहिणी सुनावणी दरम्यान कोर्टात पोहोचल्या आहेत. मात्र सलमानच्या बॉडीगार्डला कोर्टात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं होतं. यावेळी मीडियासोबत देखील सलमानचा बॉडीगार्ड शेराची झटापट झाली.

आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्याआधी राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली करण्यात आले आहे.

काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या सलमान खानला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच १० हजारांचा दंडही ठोठावला होता. शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार होती पण न्यायालयाने सुनावणी न करता निर्णय राखून ठेवला. त्यामुळे सलमानला शुक्रवारची रात्रही तुरुंगात काढावी लागली.