नवी दिल्ली: गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव करण्याची किमया करून दाखवली. राहुल यांनी काही वेळापूर्वीच अमेठीतील आपला पराभव मान्य केला. यानंतर स्मृती इराणी यांनीही ट्विटरवरून दुष्यंत कुमार यांचा एक उर्दू शेर लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या आजच्या विजयाने अमेठी मतदारसंघातील गांधी घराण्याचे वर्चस्व अनेक दशकांचे वर्चस्व मोडीत निघाले आहे. या विजयाला समर्पक असा हा शेर आहे.
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला पराभव मोठ्या मनाने मान्य केला. त्यांनी म्हटले की, मला अमेठीवासियांचा निर्णय मान्य आहे. मी स्मृती इराणी यांना इतकेच सांगू इच्छितो की, त्यांनी आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे राहुल गांधी म्हटले.
कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता ...
— Smriti Z Irani (@smritiirani) May 23, 2019
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपप्रणित एनडीएने ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३०० पेक्षा अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे चित्र दिसत आहे.