नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या चांदीच्या दरांमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळाली. आज वायदा बाजारात सोन्याचे दर २६३ रूपयांची घसरण नोंदवली आहे. बाजार उघडताच सोन्याच्या दरांमध्ये १३४ रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांमध्ये होत असलेले चढ-उतार पाहता सोन्यात गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित होत आहे. परिणामी उत्सवांचा हंगाम सुरू असला तरी सोन्याला मागणी नसल्याचं चित्र दिसून येत आहे.
सध्या वायदा बाजारात सोन्याचे दर ५१ हजार ३३३ आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात ०.४८ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे सोने प्रति औंस १,९२४.५० डॉलरवर गेले होते.
एचडीएफसी सेक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयांचे अवमुल्यन झाल्याने बुधवारी सोन्याच्या दरात ५१२ रूपयांनी वाढ झाली होती. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील वाढ नोंदवण्यात आली. १ हजार ४४८ रूपयांच्या वाढीसह चांदी ६४ हजार १५ रूपयांवर पोहोचली.
मंगळवारी चांदीचा दर ६२ हजार ५६७ एवढा होता. तर बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपया ७३.५८ एवढा होता. त्यामुळे आता बाजारातील मागणी कमी झाल्यामुळे सोन्या-चांदीचे व्यवहारही कमी झाले आहेत.
दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर नेमके किती असणार हासुद्धा अनेकांच्याच मनात घर करणारा प्रश्न. ब्रोकर्स पोलच्या निरिक्षणातून एक लक्ष वेधणारी बाब समोर आली. ती म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर चांगलीच उंची गाठणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी तफावत असणार आहे.