UP Crime News : उत्तर प्रदेशात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आली आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊजी निहाल खान याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुतण्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशला आला असतानाच निहाल खानवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील जलालाबादमध्ये दाऊद इब्राहिमच्या भाऊजीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊजीची त्याच्या पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी जलालाबादला आला होता. मात्र त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कार्यक्रमामध्ये त्याचा कोणाशी तरी वाद झाला आणि वाद इतका वाढला की त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
निहाल खान हा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा भाऊजी होता. निहाल खानच्या कौटुंबियांनी गुरुवारी ही माहिती दिली. तसेच निहाल हा जलालाबाद नगरपरिषदेचे सभापती शकील शकील खान यांचा मेहुणा होता. निहालने शकील खान यांच्या भाचीसोबत 2016 मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर दोघांमधला वाद मिटला होता. मात्र त्यांच्या भावाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे.
निहालची 15 फेब्रुवारीला फ्लाइट चुकली होती आणि तो रस्त्याने इथे आला होता. माझा भाऊ कामिल 2016 च्या प्रकरणानंतर निहालवर अजूनही रागावला होता आणि त्याला बदला घ्यायचा होता, असे शकील खान म्हणाले. निहाल खानचा खून करण्यासाठी कामिल तीन दिवस कारमध्ये परवाना असलेली रायफल घेऊन फिरत होता. बुधवारी रात्री त्याने संधी साधून निहालवर गोळी झाडली. मृत निलाहच्या पत्नीने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.
कशी झाली हत्या?
मुंबईच्या भायखळा परिसरात राहणारा निहाल खान हा कापड आणि बांधकाम व्यावसायिक होता. शकील खान यांचा मुलगा अब्दुल रज्जाक याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो 15 फेब्रुवारी रोजी कुटुंबासह जलालाबाद येथे आला होता. बुधवारी रात्री सुलतानपूर गावात एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरोपी वीटभट्टी चालक कामिल हा पत्नी आणि मुलांसह कारमधून कार्यक्रमाला आला होता. यावेळी त्याच्याकडे त्याची रायफल देखील असल्याचे म्हटले जात आहे.
त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास जेवण करून निहाल हा इतर नातेवाईकांसोबत एका घराबाहेर उभा होता. त्याचवेळी कामील तिथे आला आणि त्याने रायफलने निहालवर गोळी झाडली. गोळी निहालच्या कपाळातून बाहेर आली आणि पाठीमागील विजेच्या खांबाला लागली. या घटनेनंतर कामीलने कार तेथेच सोडून रायफलसह पळ काढला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कामिलला लग्नातच निहालची हत्या करायची होती असा संशय आहे, मात्र तिथे मोठी गर्दी आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने तिथे त्याला हा गुन्हा करता आला नाही. त्यामुळेच त्यांने गावात जावून त्याची हत्या केली.