Kedarnath Landslide : (Himachal Pradesh, Uttarakhand) हिमाचल प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत पावसानं थैमान घातलेलं असतानाच आता याच पावसाचं आणि निसर्गाचं रौद्र रुप दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमुळं उत्तराखंड आणि नजीकच्या पर्वतीय भागांमध्ये पावसानंतरची नेमकी स्थिती किती भयावह झाली आहे याचच दृश्य पाहायला मिळतंय.
सोशल मीडियावर सध्या उत्तराखंडच्या केदारनाथ येथील व्हायरल होणारा व्हिृडीओ भीमबली प्रांतातील असून, इथं 11 ऑगस्ट 2024 ला दुपारी झालेल्या भूस्खलनामुळं उदभवलेली भयाण परिस्थिती आता प्रशासनाचीही चिंता वाढवून गेली आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार संपूर्ण डोंगरच मंदाकिनी नदीच्या प्रवाहास कोसळला. स्थानिक आणि प्रवाशांनी या भूस्खलनाचा व्हिडीओ चित्रीत करत तो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार मंदाकिनी नदीच्या बलशाली प्रवाहामध्ये सुरुवातीला काही माती पडण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण डोंगरकडा कानठळ्या बसवणारा आणि धडकी भरवणारा आवाज करत पाण्यात कोसळला. हा पर्वतासम भाग नदीमध्ये कोसळल्यानं नदीचा प्रवाह थांबून तिथं मोठा डोह तयार झाला.
#Kedarnathlandslide केदारनाथ येथे मंदाकिनी नदीवर भूस्खलन.... pic.twitter.com/v1OjcVOvUs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 12, 2024
स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मंदाकिनी नदीच्या वरील भागामध्ये तलावक्षेत्र निर्माण झालं असून, प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये कोणत्याही जीवित हानीचं वृत्त समोर आलेलं नाही. जिल्हा व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांच्या माहितीनुसार भीमबली हॅलिपॅडसमोरून वाहणाऱ्या नदीवर असणारा पर्वत कोसळल्यानं मंदाकिनी नदीचा प्रवाह खंडित झाला.
एप्रिल 2024 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जारी केलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला हिमालयात जवळपास 2431 ग्लेशिअर असून, यामधील 676 ग्लेशिअर असे आहेत ज्यांचा आकार सातत्यानं वाढतोय. या ग्लेशिअरमधील 130 ग्लेशिअर भारतीय हद्दीत असून, ते खंडित होण्याचा सर्वाधिक धोका भेडसावताना दिसत आहे.
जागतिक तापमानवाढीमुळं हे ग्लेशिअर वितळण्याचा झोका असून, त्यामुळं परिणामस्वरुप भूस्खलनाच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. पर्वतांवरील या भूस्खलनामुळं नद्यांचे प्रवाह बदलल्यास भविष्यात एक दिवस या नद्या मूळ प्रवाहाच्याच दिशेनं वाहण्याचं समीकरण असल्यामुळं याचा धोका आणि त्यामुळं होणाऱ्या हानीचं चित्र अधिक विदारक असू शकतं. ज्यामुळं वेळीच सावध होण्याची गरज आता भासू लागली आहे.