Vehicle Scrapping Policy: सध्या इलेक्ट्रीक वाहने रस्त्यावर धावताना दिसू लागली आहेत. येत्या काळात रस्त्यावर सगळीकडे इलेक्ट्रीक वाहनेच दिसतील असे सांगण्यात येते. त्यामुळे तुमच्याकडे असलेली गाडी खूप जुनी वाटू लागेल. त्यातच स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे जुनी गाडी भंगार वाटू लागली आहे. पण तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर तुम्हाला दुप्पट फायदा होण्याची शक्यता आहे. कसं ते जाणून घ्या.
खूप प्रदूषण पसरवणाऱ्या गाड्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत बीएस-2 आणि त्याआधीच्या उत्सर्जन मानकांची वाहने हटवून नवी वाहने खरेदी करणाऱ्यावर मिळणारी सूट दुप्पट करुन 50 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जुन्या वाहनांना भंगार केल्यानंतर नवीन वाहन खरेदीवर मोटर वाहन टॅक्समध्ये 25 टक्के सवलत मिळते. कमर्शियल वाहनांवर ही सूट 15 टक्के इतकी असणार आहे.
सरकार सामान्य लोकांना जुनी आणि नादुरुस्त वाहने स्क्रॅप करण्याची सुविधा देत आहे. या धोरणाचा फायदा खासगी आणि व्यावसायिक दोन्ही वाहन मालकांना होऊ शकतो. जुन्या कार, बाईक, स्कूटर इत्यादी स्क्रॅप करण्यासाठी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीचा फायदा उपलब्ध आहे.
हे उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमची डिझेल कार 10 वर्षे जुनी आहे आणि पेट्रोल कार 15 वर्षे जुनी आहे, तर ती स्क्रॅपसाठी देऊन तुम्ही या पॉलिसी अंतर्गत कार खरेदी करताना मोठी रक्कम वाचवू शकता.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 24 जानेवारी रोजी एक मसुदा नोटिफिकेशन जारी केले होते. त्यानुसार 50 टक्क्यांपर्यंतची सवलत बीएस-1 मानकांचे पालन करणाऱ्या किंवा त्याच्या अंमलबजावणीपूर्वीच्या सर्व वाहनांवर लागू असेल, असे त्यात म्हटले होते.हा नियम व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही प्रकारच्या गाड्यांसाठी लागू असेल. मसुद्याच्या नोटिफिकेशननुसार, ही सवलत मध्यम आणि जड खासगी आणि वाहतूक वाहनांमध्ये येणाऱ्या बीएस-2 वाहनांना देखील लागू असणार आहे.