मुंबई : जेवण बनवताना प्रत्येक पदार्थाचं प्रमाण बरोबरच असायला लागलं नाहीतर जेवणाची चव बिघडते. परंतु जेवण बनवताना सगळ्यात महत्वाचं असतं ते मिठ. कारण मिठ हे तुमच्या पदार्थांची चव वाढवतं. परंतु याच मिठाचं जर प्रमाण चुकलं तर मात्र ते संपूर्ण जेवणाची चव बिघडून टाकतं. तसेच जास्त मिठ हे चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील हनिकारक आहे, ज्यामुळे डॉक्टर देखील नेहमीच आपल्याला कमी मिठ खाण्याचा सल्ला देतात.
तुमच्यासोबत देखील असं बऱ्याचदा घडलं असावं की, जेवणात अंदाज न आल्यामुळे मिठाचं गणित बिघडलं. मिठ कमी पडलं तर जेवणात किंवा पदार्थात मिठ पुन्हा घालता येतं. परंतु मिठ जर जास्त पडलं तर काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला अशा वेळीस काय उपाय करावेत? हे सांगणार आहोत.
एक कच्चा बटाटा कापून तुमच्या जेवणात किंवा पदार्थात घाला, यामुळे बटाट्याचे तुकडे तुमच्या भाजीमधील मीठ शोषून घेतील. बटाटा तुमच्या भाजीच्या किंवा पदार्थांच्या भांड्यामध्ये सुमारे 20 मिनिटे राहिल याची खात्री करा आणि ते धुवून सोलण्यास विसरू नका.
तुम्ही उकडलेले बटाटे देखील वापरू शकता, उकडलेले बटाटे तुमच्या भाजीत घालू शकता. यामुळे तुमची डिश बदलेल, पण जेवणातील मीठ कमी होईल.
तुम्ही तुमच्या भाज्यांमधील खारटपणा कमी करण्यासाठी पीठ देखील वापरू शकता. पिठाचे छोटे गोळे करून प्रमाणानुसार ठेवावे. हे छोटे गोळे तुमच्या अन्नातून जास्त मीठ शोषून घेतील, थोड्या वेळाने हे गोळे काढून टाका.
क्रीम वापरल्याने, अन्नातील मीठाचे प्रमाण कमी होते, जर तुम्हाला जेवणात क्रिम किंवा त्याची गोड चव चालणार असेल, तर तुम्ही जेवणात क्रिम वापरु शकता. यामुळे देखील मिठाचं प्रमाण कमी होतं.
तसेच दही घालून देखील तुम्ही त्याचा खारटपण कमी करु शकता, भाजीत एक चमचा दही घालून शिजवा, चवही वाढेल आणि अतिरिक्त मीठाचे प्रमाणही कमी होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध देखील वापरू शकता.
अन्नातील मीठ कमी करण्यासाठी तुम्ही कच्चा किंवा तळलेला कांदा देखील घालू शकता. कच्च्या कांद्याचे दोन तुकडे करून भाजीत घाला. काही मिनिटांनंतर ते काढून टाका आणि जर तुम्ही तळलेला कांदा घालत असाल, तर लक्षात ठेवा की, यामुळे तुमच्या जेवणाची चव बदलू शकते.
तुम्ही व्हिनेगर आणि साखरेचाही वापर करून जेवणातील मीठ कमी करू शकता. हे तुमच्या अन्नाला गोड आणि आंबटपणा देऊन आणि जेवणाची चव बदलून मीठाचे प्रमाण संतुलित करते.