Indian Spices Banned: भारतीय मसाले आपली चव आणि दर्जासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले उत्तम चवीसोबत आरोग्याला फायदे देणारे असतात. पण काही दिवसांपूर्वी हाँगकाँग आणि सिंगापूरमधील दोन भारतीय ब्रँडच्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली होती. कारण या मसाल्यांमध्ये अशा केमिकलचं प्रमाण अधिक होतं, जे कॅन्सरची निर्मिती करु शकतात. त्यातच आता राजस्थानध्ये 5 कंपन्यांच्या 7 मसाले खाण्याच्या लायकीचे नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) वारंवार सुट्या मसाल्यांमध्ये भेसळ होऊ शकते असं सांगत असतं. पण आता मात्र ब्रँण्डेड मसालेही आपली विश्वासार्हता गमावत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 8 मे रोजी राजस्थान सरकारने 93 नमुने गोळा केले होते. यामध्ये 5 मोठ्या भारतीय कंपन्यांचे मसाले सेवन करण्यासाठी पूर्णपणे असुरक्षित असल्याचं आढळलं आहे.
रिपोर्टनुसार, ज्या भारतीय कंपन्यांचे मसाले खाण्यासाठी असुरक्षित ठरवण्यात आले आहेत त्यामध्ये एमडीएच, एव्हरेस्ट, गजानंद, श्याम आणि शीबा यांचा समावेश आहे. यांच्या ताज्या मसाल्यांमध्ये आक्षेपार्ह केमिकलचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याचं आढळलं आहे. हे केमिकल कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतं. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे.
एमडीएचच्या गरम मसाल्यामध्ये Acetamiprid, Thiamethoxam आणि Imidacloprid आढळलं आहे. तर भाजी मसाला आणि चना मसाल्यामध्ये Tricyclazole आणि Profenofos प्रमाण जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. ही घातक रसायनं सिद्ध होऊ शकतात.
Thiamethoxam हे केमिकल किटकनाशक आहे. अनेक प्राणी संशोधनात हे धोकादायक असल्याचं आढळलं आहे. एका अभ्यासानुसार, Thiamethoxam चं फार काळ सेवन केल्यास मेंदू, यकृत यासह महिलांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होते.
एव्हरेस्टचा जीरा मसाला, श्यामचा गरम मसाला, गजानंदचा लोणचा मसाला आणि शीबा फ्रेशचा रायता मसाला असुरक्षित आढळला आहे. त्यांच्यात Acetamiprid, Thiamethoxam, Ethion आणि Azoxystrobin सापडले आहेत.
कीटकनाशकांपासून कर्करोगाचा धोका तुम्ही ते कसे खातात, किती प्रमाणात खातात आणि ते कार्सिनोजेन आहे की नाही यावर अवलंबून असते. एका अभ्यासानुसार, Thiamethoxam मुळे उंदरांमध्ये यकृताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आलं आहे. त्यामुळे अशा कीटकनाशकांचे जास्त प्रमाण मानवांसाठी धोकादायक मानले जाते.
Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.