Parenting Tips in Marathi : घरात लहान मुलं असलं की, घराच्या भिंती, सोफे, दरवाजे एवढंच नव्हे तर फ्रिज देखील रंगवून ठेवतात. मुलांच्या हातात मिळेल ते भिंतीवर खरवडून किंवा रंगवून काढणे हा मुलांचा छंद. पण तुम्हाला माहित आहे का? मुलांच्या या सवयीमध्ये फक्त खोडकरपणा किंवा या बाललिला नाहीतर तर ही एक सवय आहे. या सवयीला तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळलंत तर मुलांना नक्कीच याचा भविष्यात फायदा होईल.
अनेक पालकांना मुलांचं हे रंगकाम कंटाळवाणं किंवा पसारा वाटतं. पण असं न बघता या मुलांना तुम्ही या रंगकामाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकवू शकता. कोणत्या ते जाणून घेऊया.
मुले नैसर्गिकरित्या सर्जनशील म्हणजेच क्रिएटिव्ह असतात. त्यांना स्वातंत्र्य, साहित्य आणि त्यांची सर्जनशीलता पूर्ण क्षमतेने फुलवणे हे आमचे काम आहे, असं लेखिका Jean Van't Hul सांगते.
जन्मानंतर मुलासाठी प्रत्येक गोष्ट नवीन असते. अशावेळी त्याला आपलं असं वाटणारं हक्काचं त्याच घर असतं. त्यामुळे आपला स्वच्छंदीपणा तो घरात सांभाळतो. अशावेळी हातात खडू मिळाल्यावर भिंती रंगवण्याचा प्रकार सुरु होतो.
मुलं घरं रंगवतात म्हणून अनेक पालक हातातून खडू काढून घेण्यासारखी चूक करतात. पण पालकांनी असं अजिबात कर नये. कारण हातात खडू पकडल्यामुळे मुलांच्या हाताची पकड मजबूत होते. त्याचा आत्मविश्वास याच छोट्या छोट्या गोष्टींनी वाढतो.
मुलांसाठी प्रत्येक गोष्ट नवी असते. त्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. अशावेळी रंगांची ओळख मुलांना होणे ही अतिशय आवश्यक असते. रंगसंगतीवरुन त्यांची नजर चांगली होते. म्हणून पालकांनी मुलं भिंती रंगवत असताना त्यांच्यासोबत बसून रंगांची ओळख करून द्यावी.
मुलं भिंती रंगवत असताना पालकांनी त्याकडे थोडं लक्ष देऊन पाहावं. मुलांच भावविश्व तयार होत असतं. तेव्हा त्यांच्या भावविश्वात काय आहे हे जाणून घेण्याची हीच चांगली संधी आहे. तेव्हा पालकांनी मुलांचं हे रंगकाम आवर्जून पाहावे. फक्त एवढंच नाही तर त्याचे भरभरून कौतुकगही करावे. कारण त्या कौतुकास ते नक्कीच पात्र असतात.
भिंती रंगवत राहणं हे ठराविक वेळे नंतर पालकांसाठी त्रासदायक ठरू शकते. अशावेळी पालक मुलांना कोणत्या भाषेत या गोष्टी समजावून सांगतात हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. कारण या भाषेचा मुलांच्या स्वभावावर परिणाम होतो. तुम्ही हळू हळू मुलांना कागद, फळा देऊन ही सवय मोडू शकता.
(फोटो क्रेडिट - Sumeet Vyas Instagram)