मुंबई / नागपूर : राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल नागपूर येथील विद्युत भवनातून व्ही.सी.द्वारे आयोजित बैठकीत दिल्या.
महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या कामकाजाचा ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा. राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती,महावितरण,महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न करावेत- ऊर्जा मंत्री pic.twitter.com/K4GQZRuE4C
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 18, 2020
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी आज संवाद साधला. एनटीपीसीने हा सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीने प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा शोध घेऊन याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटचा आणि नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथील २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC यांनी घेतला आढावा. गव्हाणकुंड प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात, लवकरच वीजनिर्मिती सुरु होईल- ऊर्जा मंत्री
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 18, 2020
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पाकडे सर्वानी गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सौर आणि पवन ऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञानी विचार करण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण, महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणालेत.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्यात असून लवकरच यातून वीजनिर्मिती सुरु होईल अशी माहिती महानिर्मितीतर्फे ऊर्जामंत्र्यांना देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्याना दिल्या.