कल्याणमध्ये पोलिसांनी मोबाईल चोराला अटक केल्यानंतर एका रहस्यमय मृत्यूचा उलगडा झाला आहे. हा चोर धावत्या ट्रेनमधील एका प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत होता. आकाश जाधव असं या चोराचं नाव आहे. सोमवारी एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये सेल्फी व्हिडीओ शूट करत असताना आकाश जाधव याने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
झाहीद झैदी मोबाईल फोनवर स्वत:चा व्हिडीओ शूट करत असताना आकाश जाधवने मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. पण आकाशला यश मिळालं नाही. दरम्यान चोरीच्या या प्रयत्नात आकाशचा चेहरा मात्र झैदीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. झैदीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांकडून मदत मागितली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आकाश जाधवला बेड्या ठोकल्या.
"मंगळवारी आम्ही एका संशयिताला अटक केली. त्याच्याविरोधात ठाण्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्हाला त्याच्याकडे एक मोबाईल सापडला आहे," अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडे हा मोबाईल कुठून चोरला यासंबंधीही चौकशी केली.
मोबाईल स्विच ऑन केला असता तो पुण्याचे रहिवासी प्रभास भांगे यांचा असल्याचं उघड झालं. प्रभास भांगे बँकेत कामाला होते. होळीच्या सुट्टीनिमित्त ते पुण्यातून घऱी आले होते. पुण्याला परत जात असताना 25 मार्चला मध्यरात्री विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर पडून त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांना प्रभास भांगे धावत्या ट्रेनमधून खासी कसे पडले याची काहीच माहिती नव्हती. पण त्यांनी आकाश जाधवकडे चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला. आकाश जाधवने धावत्या ट्रेनमधून प्रभास भांगे यांचा मोबाईल चोरला होता. तो मोबाईल परत मिळवण्याच्या नादात प्रभास यांनी आपला जीव गमावला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितलं की, "ते कल्याणवरुन पुण्याला निघाले होते. विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात आकाश जाधवने त्यांचा मोबाईल खेचून घेतला. मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी प्रभास भांगे धावत्या ट्रेनमधून खाली उतरले आणि आपला जीव गमावला". पोलिसांनी आरोपी आकाशविरोधात गुन्हा दाखल केला आहे.