Kasara Tunnel Samruddhhi Highway : ठाण्यातून नाशिकला जायचं असेल तर कसारा घाटाशिवाय पर्याय नाही. मात्र, एकदा कसारा घाटात अडकलं की तीन चार तासाशिवाय सुटका नाही. कसारा घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवास त्रासदायक होतो. मात्र, आता लवकरचं या त्रासदायक प्रवासातून सुटका होणार आहे. कारण, आता ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. कसारा घाटातील त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात पूर्ण होणार आहे. हे शक्य होणार आहे ते समृद्धी महामार्गामुळे.
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. समृद्धी महामार्गावरील इगतुरी ते ठाण्यादरम्यान अमने हा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. हा टप्पा पू्रण झाल्यानतंर येथून वाहतूक सुरु झाल्यानंतर नागपूर ते भिवंडी अंतर केवळ आठ तासांत पूर्ण होणार आहे. तर, इगतपूरी ते अमणे हा प्रवास सव्वा तासांत पूर्ण करता येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ठाणे ते नाशिक प्रवास फक्त अडीच तासात पूर्ण होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यात एकूण 5 बोगदे बांधण्यात आले आहेत. इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गावरील ( Samruddhhi Highway ) चौथ्या टप्प्यातलं सर्वात महत्वाचा भाग म्हणजे इगतपुरी येथील आठ किमी लांब बोगदा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बोगदा समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाटातून प्रवास करावा लागणार नाही. कसारा घाटाचं सध्याचं अंतर बारा किमी आहे कसारा घाट पार करण्यासाठी सध्या एक तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या बोगद्यातून गेलेल्या मार्गामुळे आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
समृद्धी महामार्गावरील अंतिम टप्पा हा 76 किमीचा आहे. हा टप्पा इंजिनीयर्ससाठी मोठे चॅलेंज आहे. या टप्प्यात तब्बल 17 दऱ्या आहेत. येथे तब्बल 17 पुल उभारले जात आहेत. यांची एकत्रित लांबी तब्बल 11.5 किमी आहे. भातसा नदीवर सर्वाधिक लांबीचा 2.28 किमी लांबीचा व्हॅलीपूल उभारण्यात आला आहे.
नागपूर ते शिर्डी या 520 किमी लांबीच्या पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांबीचा टप्पा देखील सुरु झाला आहे. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. आता प्रतिक्षा आहे ती महत्वाच्या टप्प्याची. 76 किमी लांबीच्या इगतपुरी ते आमणे असा हा मार्ग आहे.