भास्कर जाधव नाराज? कोकणातील एकमेव आमदारही ठाकरेंची साथ सोडणार?

भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.  

शिवराज यादव | Updated: Feb 15, 2025, 09:25 PM IST
भास्कर जाधव नाराज? कोकणातील एकमेव आमदारही ठाकरेंची साथ सोडणार? title=

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पदाधिका-यांसह महत्त्वाचे नेतेही ठाकरेंना रामराम ठोकत आहेत. त्यातच शिंदेंच्या ऑपरेशन टायगरअंतर्गत कोकणातील राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला आहे. त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे.

भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही. हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केलीये आणि चर्चांना उधाण आलं. 

भास्कर जाधवांची कुठली नाराजी किंवा खंत असेल तर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. भास्कर जाधव यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे असतात. त्यामुळे त्यांची काही नाराजी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला माजी खासदार विनायक राऊतांनी दिला आहे.

भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करताच शिवसेनेत त्यांचं स्वागत करु असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना ऑफर दिली आहे. उदय सामंतांपाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भास्कर जाधवांच्या कामाच कौतूक केलं आहे. भास्कर जाधव हे काम करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. मात्र, भाजपमध्ये जाधवांबाबत कुठलीही चर्चा नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

भास्कर जाधवांची राजकीय कारकीर्द 

-- भास्कर जाधव 1982 पासून शिवसेनेत
-- 1995 ते 2004 दरम्यान चिपळूणमधून दोन वेळा आमदार
-- 2004 - शिवसेनेला सोडचिठ्ठी
-- 2006 - महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य
-- 2009 - राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवत विजयी
-- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात नगरविकासमंत्री
-- 2013 - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
-- 2014 - महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून विजयी
-- 2019 निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश
-- 2019 आणि 2024 निवडणुकीत शिवसेनेचे आमदार

अवघ्या 2 दिवसांपूर्वीचं राजन साळवींनी मशाल सोडून धन्युष्यबाण हाती घेतला. यामुळे शिंदेंची ताकद कोकणात वाढली. त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे भास्कर जाधवांची नाराजी दूर होणार की जाधव सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.