Who is Abhinav Chandrachud: शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सरन्यायाधीश (Chief Justice of India) संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने नेहमीप्रमाणे प्रकरणांची सुनावणी सुरु केली. यावेळी त्याच्यामध्ये हाय-प्रोफाईल केस 'इंडियाज गॉट लेटेंट' वादाचाही समावेश होता, ज्यामध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाचा समावेश आहे. कामकाज सुरू होताच रणवीर अलाहबादियाच्या वतीने त्याचे वकील न्यायालयात हजर झाले. विशेष म्हणजे या वकिलाने गेल्या आठ वर्षं आणि सहा महिन्यात सर्वोच्च न्यायालयात एकही खटला चालवलेला नाही. परंतु तरीही त्याच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या वकिलाचं नाव अभिनव चंद्रचूड आहे. अभिनव चंद्रचूड मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा मुलगा आहे
अभिनव चंद्रचूड यांच्या कुटुंबाचं नाव वकिली क्षेत्रात फार आदराने घेतलं जातं. त्यांच्या वडिलांना मे 2016 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते भारताचे सरन्यायाधीश झाले. न्यायव्यवस्थेत वडील इतक्या मोठ्या पदावर असतानाही अभिनव यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात कधीही सर्वोच्च न्यायालयात खटला सादर केला नव्हता.
आपल्या निरोपाच्या भाषणात, सरन्यायाधीश (निवृत्त) चंद्रचूड यांनी आपली दोन्ही मुलं अभिनव आणि चिंतन यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला होता. आपण त्यांना एकदा सुप्रीम कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं, जेणेकरुन त्यांना अधिक वेळा भेटता येईल. पण व्यावसायिक प्रामाणिकपणाचा दाखला देत त्यांनी नकार दिला होता.
एका मुलाखतीत माजी सरन्यायाधीश (निवृत्त) चंद्रचूड यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल सांगितलं होतं. 1982 ते 1985 दरम्यान हार्वर्डमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी कोणत्याही भारतीय न्यायालयात हजर राहण्याचं टाळलं होतं. त्यांचे वडील न्यायमूर्ती वाय.व्ही. चंद्रचूड हे भारतातील सर्वात जास्त काळ सेवा करणारे सरन्यायाधीश होते.
अभिनव चंद्रचूड लेखकही आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून डॉक्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ (JSD) आणि मास्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ (JSM) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने 2008 मध्ये मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. नंतर हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्यात पदव्युत्तर पदवी (LLM) मिळवली. त्यांनी गिब्सन, डन अँड क्रचर या आंतरराष्ट्रीय कायदा फर्ममध्ये सहयोगी वकील म्हणूनही काम केलं आहे.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये रिपब्लिक ऑफ रेटोरिक: फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (2017) आणि सुप्रीम व्हिस्पर्स: कॉन्व्हर्सेशन्स विथ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया 1980-1989 (2018) यांचा समावेश आहे. अनेक आघाडीच्या वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रकाशित केले जातात.