'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'

सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 15, 2025, 07:09 PM IST
'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...' title=

वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवलेली असावी, असं सूचक विधान राजन साळवी यांनी केलं आहे. त्यामुळे वैभव नाईकही उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हे विधान केलं आहे. 

आगामी काळात कोकणातील आणखी काही नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडतील अशी चर्चा सुरु आहे, वैभव नाईक संपर्कात आहेत का? असं विचारण्यात आलं असता राजन साळवींनी सांगितलं की, "मला याची काही कल्पना नाही. ती जबाबदारी माझ्याकडे नाही. मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी कदाचित उदय सामंत यांच्याकडे ही जबाबदारी दिली असावी". पुढे ते म्हणाले, "कोकणात सावंतवाडीपासून ते चिपळूणपर्यंत कोणाला किती त्रास होतो? मनात किती खदखद आहे? असं फोन करुन विचारलं तर पाढा वाचतील". 

वैभव नाईक यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. झी 24 तासला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं आहे की, "राजन साळवींनी शिवसेना सोडली याबद्दल काही मत नाही. आम्हाला दोन वेळा शिवसेनेने आमदार केलं. उद्धव ठाकरे संकटात असताना आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. ज्या पद्दतीने आज सत्ताधारी काम करत आहेत आणि फोडाफोडी करत आहेत त्याला आमच्या पद्धतीने शक्य तेवढा विरोध करु. आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जाऊ. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत सामान्य शिवसैनिक म्हणून ठामपणे उभे राहू". 

'गेल्या दोन तीन महिन्यात मी माझा मतदारसंघ, जिल्हा सोडून कुठेही गेलेलो नाही. त्यामुळे माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही, संपर्क साधलेला नाही. मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे. आम्ही पराभव मान्य केला आहे. आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत. आम्ही सामान्य शिवसैनिक म्हणून काम करत आहोत. आमच्या काही अपेक्षा नसल्याने आम्हाला संपर्क करण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आम्हीही करणार नाही," असं वैभव नाईक म्हणाले आहेत.  

"आज उद्धव ठाकरेंनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरे तळागळापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा करतील. त्यातून नक्की मार्ग काढतील. काही चुकीच्या गोष्टी असतील तर कारवाई करतील अशी खात्री आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.