मुंबई इंडियन्स 'या' दिवशी खेळणार IPL 2025 ची पहिली मॅच, महत्वाची माहिती समोर

IPL 2025 : आयपीएल संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत असते.  आयपीएल संघांनी सरावाला सुरुवात केली असून त्याचे अपडेट्स ते सोशल मीडियावर देत असतात. 

पुजा पवार | Updated: Feb 15, 2025, 06:19 PM IST
मुंबई इंडियन्स 'या' दिवशी खेळणार IPL 2025 ची पहिली मॅच, महत्वाची माहिती समोर  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असून त्याच्या आगामी 18 व्या सीजनकडे अनेक क्रिकेट प्रेमींचे डोळे लागलेले आहेत. आयपीएल संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. नोव्हेंबर महिन्यात आयपीएल 2025 (IPL 2025) साठी मेगा ऑक्शन सुद्धा पार पडले. ज्यात जवळपास 182 खेळाडूंना यात संघांनी खरेदी केले. आता आयपीएल संघांनी सरावाला सुरुवात केली असून त्याचे अपडेट्स ते सोशल मीडियावर देत असतात. लवकरच बीसीसीआय आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मात्र त्यापूर्वी क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयपीएलचा नवा सीजन 22 मार्च पासून सुरु होणार अशी माहिती समोर आलीये. 

आयपीएल 2025 मध्ये यंदा देखील 10 संघांचा सहभाग असणार आहे. गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. तर 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियात झालेल्या ऑक्शनमध्ये भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी 27 कोटींची बोली लागली. तर दुसऱ्या क्रमांकाला पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी खर्च करून केकेआरने आपल्या संघात घेतले.

हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली

मुंबई इंडियन्स होम ग्राउंडवर कधी खेळणार पहिला सामना? 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 मधील त्यांचा पहिला होम ग्राउंड सामना वानखेडे स्टेडियमवर 31 मार्च रोजी होणार आहे.  तसेच यापूर्वी मुंबई इंडियन्स स्पर्धेतील दोन सामने खेळेल. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 चा सीजन फार चांगला गेला नव्हता, स्पर्धेच्या अंती ते पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होते. यंदाही मुंबईचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे असून यावर्षी संघ कसा परफॉर्म करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

ipl 2025

कधी सुरु होणार आयपीएल? 

बीसीसीआयचे राजीव शुल्का यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आयपीएल 2025 मार्च 21 पासून सुरु होईल तर याचा अंतिम सामना हा 24 मे रोजी होणार असल्याचे सांगितले होते. परंतु आता क्रिकबझला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मार्च पासून आयपीएल 2025 ला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडेल. तर 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडेल.  टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गुजरात टायटन्स त्यांचा पहिला होमग्राउंडवरचा सामना हा 25 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळेल.