Champions Trophy 2025 : इंग्लंड विरुद्ध वनडे सिरीजमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाची नजर चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकण्यावर आहे. वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टीम इंडिया लागोपाठ दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. यात भारताचे सर्व सामने दुबईत होणार असून यासाठी टीम इंडिया लवकरच दुबईला रवाना होईल. मात्र असं असताना भारताचा माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने फॅन्सची धाकधूक वाढवली आहे. आकाश चोप्राच्या मते विराट, रोहित आणि जडेजा या तीन दिग्गज खेळाडूंची ही शेवटची आयसीसी टूर्नामेंट असू शकते.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तीन दिग्गज क्रिकेटर्सनी वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आकाश चोप्राचं म्हणणं आहे की हे तीन सिनिअर खेळाडू 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाट पाहतील असं वाटत नाही. आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हंटले की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी करिअरला पूर्णविराम देण्याची चांगली संधी या तीन दिग्गजांकडे आहे.
हेही वाचा : WPL च्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेज, पहिल्याच सामन्यात तब्बल 400 धावा, सर्व रेकॉर्ड धुळीस
माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटले की, 'मी जड अंतःकरणाने बोलतोय... दाट शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे त्यानंतर यावर्षी फक्त एक आयसीसी टूर्नामेंट असेल जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आहे, आणि जिथे भारत पोहोचू शकला नाही. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यापैकी कोणीच खेळणार नाही. त्यानंतर पुढच्यावर्षी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप आहे. परंतु टी 20 क्रिकेटमधून तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतलीये. त्यामुळे हे तिघे तिथेही दिसणार नाहीत. वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये होईल जो सध्या खूपच दूर आहे. 2027 पर्यंत जग खूप वेगळं असेल. त्यामुळे मला आणि इतर काही खेळाडूंनाही वाटतं की चॅम्पियन्स ट्रॉफी ही या तीन दिग्गज खेळाडूंची शेवटची आयसीसी टूर्नामेंट असेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे मागील काही महिन्यांपासून वाईट फॉर्ममधून जात होते. परंतु इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात रोहितने शतक ठोकून तर कोहलीने अर्धशतकासह उत्तम कामगिरी करून पुन्हा एकदा आपल्या फॉर्ममध्ये कमबॅक केलंय. टीम इंडियाकडून प्रत्येक आयसीसी टूर्नामेंटमध्ये या दोन दिग्गजांचं महत्वाचं योगदान राहिलंय. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडिया करता धावांचे योगदान देण्यासाठी दोन दिग्गज प्रयत्नशील असतील.