Vicky Kaushal: बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या नव्या चित्रपट 'छावा'मुळे चर्चेत आहे. काल 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत आहे. विक्कीने या चित्रपटात त्याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडला असून, विकीच्या करिअरमधील सर्वात जास्त ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
या आधी विकीने 'राज़ी', 'संजू', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', "सरदार उधम" आणि 'सॅम बहादूर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्याला एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर नाकारल्याचा अजूनही पश्चात्ताप आहे. हा चित्रपट नंतर जबरदस्त हिट ठरला आणि त्याचा सिक्वेलही बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.
2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'स्त्री' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंत विकी कौशल होता. पण, त्यावेळी विकी 'मनमर्जियां' या चित्रपटात काम करत होता, त्यामुळे त्याने 'स्त्री' चित्रपट करण्यास नकार दिला. एका मुलाखतीत विक्कीने सांगितले की, "माझ्या हातात आधीच 'मनमर्जियां' होती, त्यामुळे मी 'स्त्री' साठी नाही म्हणालो. मात्र, हा चित्रपट हिट ठरल्यावर मला थोडा पश्चात्ताप झाला."
'स्त्री' चित्रपटाने जगभरात 180 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाच्या अनोख्या पटकथेमुळे प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले. यानंतर 2024 मध्ये स्त्री 2' हा दुसरा भाग प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. 'स्त्री 2' ने तब्बल 857 कोटींची कमाई केली असून त्या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.
हे ही वाचा: झालं गेलं विसरून समांथाच्या जीवनात प्रेमाची एन्ट्री? Valentine's Day च्या निमित्तानं पोस्ट केला खास फोटो
विकीच्या 'छावा' या नवीन चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 33.1 कोटी रुपयांची कमाई केली असून, तो 2025 मधील सर्वात जास्त ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो. विक्कीने 'स्त्री' चित्रपट गमावला असला तरी, "छावा" मुळे त्याच्या करिअरमध्ये मोठ्ठं वळण येण्याची शक्यता आहे.