वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला आणखी एक धक्का, IIFA च्या राजदूतांच्या यादीतून नाव वगळले

'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्यानंतर अपूर्वा मखीजाचे नाव आता आयफा पुरस्कारांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 15, 2025, 01:59 PM IST
वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला आणखी एक धक्का, IIFA च्या राजदूतांच्या यादीतून नाव वगळले title=

Apoorva Mukhija: कंटेंट क्रिएटर अपूर्वा मखीजा जिला तिच्या सोशल मीडिया नावाने 'द रिबेल किड' या नावाने देखील ओळखले जाते. अपूर्वा मखीजा सध्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमुळे चर्चेत आहे. या शोमधील तिने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर तिला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यासोबतच तिला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात राजस्थानच्या जयपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याच्या अधिकृत राजदूतांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

विनोदी कलाकार समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोच्या एका भागात रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती.

दिया कुमारी यांच्या अधिकृत निवेदनात काय? 

राजस्थानच्या पर्यटन मंत्री आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याच्या यादीतून सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या अपूर्वा मखीजाचे नाव राजदूतांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. ती आता अधिकृतपणे आयफाच्या राजदूतांच्या यादीचा भाग नाही असं त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  

या महिन्याच्या अखेरीस उदयपूर येथे होणाऱ्या आयफा शोशी संबंधित अपूर्वा मखीजाच्या नियोजित शूटिंगला करणी सेनेने विरोध करत धमकी दिली आहे. पीटीआय या वृतसंस्थेच्या रिपोर्टनुसार, करणी सेनेने म्हटले आहे की, अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणालाही केवळ विरोधाला सामोरे जावे लागणार नाही तर त्यांना शारीरिकदृष्ट्याही सामोरे जावे लागेल असे उदयपूरमधील राजपूत करणी सेनेचे विभाग प्रमुख डॉ. परमवीर सिंग दुलावत यांनी सांगितले आहे. 

आयफा सोहळा कधी होणार?

राजस्थान पर्यटन मंत्रालयाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. यापूर्वी अपूर्वाला या कार्यक्रमासाठी राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, आता तिचे नाव या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.