Hair Oils: आपल्या नेहमीच्या लुक्समध्ये आपले केस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. फक्त महिलाच नाही तर पुरुषदेखील आपल्या केसांची विशेष काळजी घेतात. सध्याच्या बदलत्या वातावरणाचा केसांवरसुद्धा विपरित परिणाम होत असल्याने केसांशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. ड्रायनेस आणि केस गळतीसोबत आता केसांना फाटे फुटण्याची समस्यादेखील वाढत आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण बरेच उपाय करतो.
केसांना फाटे फुटण्यापासून वाचवण्यासाठी बऱ्याच महिला या वारंवार हेअर कट करतात. मात्र, याव्यतिरिक्त केसांची योग्यरित्या काळजी घेतल्याने आणि केसांसाठी लाभदायक असणाऱ्या हेअर ऑइल्सचा वापर केल्याने केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर केली जाऊ शकते. केसांसाठी उपयुक्त असणाऱ्या काही खास हेअर ऑइल्सविषयी जाणून घेऊयात.
खोबरेल तेलात लॉरिक अॅसिड तसेच अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. या गुणधर्मांमुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते. केसांवर खोबरेल तेल लावल्यामुळे केसांना पोषक तत्त्वं मिळतात आणि केसांना फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होते. रात्री झोपण्याच्या आधी अगदी कोमट खोबरेल तेलाने स्कॅल्पवर मसाज करा आणि केसातील तेल रात्रभर तसेच ठेवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांवर खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन E आणि ओमेगा- 3 फॅटी अॅसिड असतात, जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असतात. या तेलाच्या वापरामुळे केसांना फाटे फुटणे कमी होऊन केस रेशमी आणि चमकदार होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळा केसांना बदामाच्या तेलाने मसाज करुन दोन तासांनंतर केस शॅम्पूने धुतल्याने बरेच फायदे पाहायला मिळतात.
केसांना तुटण्यापासून वाचवण्यासाठी फायदेशीर असलेल्या कॅस्टर ऑइलमध्ये राइसीनोलेक अॅसिड असते. हे केसांचे स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते. केसांच्या वाढीसाठी आणि दाट केसांसाठी कॅस्टर ऑइल हा एक उत्तम पर्याय आहे. कॅस्टर ऑइल हे केसांच्या मजबूतीच्या दृष्टीने लाभदायक असून नेहमी खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलात मिसळून त्याचा वापर केला पाहिजे. आठवड्यातून एकदा या तेलाचा वापर केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन E मोठ्या प्रमाणात आढळतात. केसांवर ऑलिव्ह ऑइल लावल्याने केसांना डीप कंडीशनिंग मिळण्यास मदत होते, तसेच केसांना फाटे फुटण्याची समस्यासुद्धा दूर होण्यास मदत होते. केसांवर ऑलिव्ह ऑइल लावल्यानंतर 1 तासानंतर केस शॅम्पूने धुतल्याने चांगला फायदा होतो.
केसांसाठी उपयुक्त असलेल्या आर्गन आइलला 'लिक्विड गोल्ड' असेसुद्धा म्हटले जाते. केसांवर आर्गन ऑइल लावल्याने केस मऊ होण्यास मदत होते. त्याचबरोबर स्प्लिट एंड्ससुद्धा कमी होतात. शॅम्पू लावल्यानंतर केसांच्या टोकांवर आर्गन ऑइलचे २-३ थेंब टाका. यामुळे केसांचा उष्णतेमुळे होणाऱ्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.
केसांना हलक्या कोमट तेलाने मुळापासून टोकापर्यंत मसाज करा. केसांना रात्रभर तेल लावून ठेवणे जास्त फायदेशीर आहे. कामात व्यस्त असाल तर किमान २-३ तास तेल लावून ठेवा. केसांना पोषण मिळण्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावणे गरजेचे असते.