कॉमेडियन समय रैना सूत्रसंचालन करत असलेल्या 'इंडियाज गॉट लेटंट' कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अलाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र सायबर विभागाकडून अनेकांना समन्स बजावण्यात आलं असून, शुक्रवारी रोडिज फेम अभिनेता रघु चौकशीसाठी हजर झाला होता.
"BeerBiceps" या ऑनलाइन टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या अलाहबादियाने 'इंडियाज गॉट लेटंट' या शोच्या एका भागात पालक आणि सेक्सबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड टीका झाली होती. या शोमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा हे कंटेंट क्रिएटर्स देखील सहभागी झाले होते.
"तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल?", असं अलाहबादियाने एका स्पर्धकाला विचारलं होतं. या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर रणवीर अलाहबादियाने माफी मागितली आहे.
Mumbai, Maharashtra: Film actor & judge of the show India's Got Latent Raghu Ram left the Maharashtra Cyber Cell office after being questioned in the India's Got Lalent case pic.twitter.com/R91TQnHqIT
— IANS (@ians_india) February 13, 2025
रघु राम एका शोमध्ये पॅनेलमध्ये सहभागी झाला होता. चौकशीदरम्यान त्याने सायबर सेलला समय रैनाने शोमध्ये वापरण्यात आलेली आक्षेपार्ह भाषा एडिट करायला हवी होती असं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच आपण शोमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरायला नको होती असंही मान्य केलं आहे.
सूत्रांनी दावा केला आहे की, रघु रामने आपण फ्लोमध्ये चुकीचे शब्द वापरले, पण कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं सांगितलं आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने आतापर्यंत 50 जणांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अपूर्व मखीजा, आशिष चंचलानी, अलाहबादियाचा व्यवस्थापक आणि 'इंडियाज गॉट लेटेंट'चे व्हिडिओ एडिटर यांच्यासह आठ जणांची चौकशी केली आहे. शहर पोलिसांनी अद्याप या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान समय रैनाला मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या सायबर विभागानेही समन्स बजावले आहे, जे स्वतंत्र चौकशी करत आहे. समय रैनाला पाच दिवसात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. पण आपण सध्या अमेरिकेत असल्याचं सांगत त्याने अधिक वेळ मागितला आहे.
मुंबई आणि आसाम पोलिसांची टीम शुक्रवारी रणवीर अलाहबादियाच्या घरी दाखल झाली होती. मात्र त्याचा फ्लॅट बंद होता. एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, मुंबईच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि त्यांची चौकशी करण्यासाठी शहरातील वर्सोवा परिसरातील अपार्टमेंटमध्ये गेले होते. गुरुवारी अलाहबादियाला मुंबईतील खार येथील पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. आपल्या घरी जबाब नोंदवला जावा अशी विनंती त्याने केली, जी नंतर फेटाळण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आणि त्याच्या घरी पोहोचले.