अलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!

Atal Setu Suicide: अटल सेतूवरुन एका शिक्षकाने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 15, 2025, 10:50 AM IST
अलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे! title=
Alibag school teacher dies by suicide from Atal Setu after victim of sextortion

Atal Setu Suicide: अलिबाग येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वैभव पिंगळे (45) असे मृत शिक्षकाचे नाव असून सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वैभव पिंगळे हे अलिबाग येथील कुर्डुस गावात राहण्यास होते. तसेच ते प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या क्रेटा कारने अटल सेतुवर आले होते. त्यांनतर त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करुन पुलावरुन समुद्रात उडी मारली. पुलावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने तत्काळ पोलिसांना पुलावर एक कार थांबल्याची माहिती दिल्यांनतर पोलिसांनी तत्काळ कार जवळ धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच वैभव पिंगळे हे समुद्रात वाहुन गेले होते. त्यानंतर उलवे पोलिसांनी व सागरी सुरक्षा विभागाने त्यांची शोधमोहीम सुरु केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

सायबर गुन्हेगारांकडून वैभव पिंगळे यांना सेक्सटोरशनच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मागील 8 दिवसांपासून ते तणावाखाली आले होते. सायबर गुन्हेगारांकडून पिंगळे यांचा मानसिक छळ वाढल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या कारने अटल सेतू गाठले. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली कार उभी करून समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. उलवे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अटल सेतू मॅरेथॉनसाठी १३ तास बंद   

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) रविवारी, १६ फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग १३ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. एमएमआरडीएकडून रविवारी पहाटे ४ ते दुपारी १२ या वेळेत मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतूवरील वाहतूक सलग १३ तास बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना इतर पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. अटल सेतूवरील ही मॅरेथॉन रविवारी पहाटे ४ ते १२ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे मॅरेथॉन शर्यत संपल्यानंतर रविवारी दुपारी १ वाजल्यापासून अटल सेतूवरील वाहतूक सुरळीत होणार आहे.