Mumbai Local News : मुंबई रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा पाहता वेळोवेळी यंत्रणेवर लक्ष ठेवत काही तांत्रिक कामं हाती घेतली जात आहेत. त्याच धर्तीवर रेल्वे विभागानं रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी 2025 रोजी मेगाब्लॉक घेण्याचं ठरवलं आहे. ज्यासाठी लोकलच्या वेळापत्रकात बदल केला जात असून, रविवारच्या दिवशी तिन्ही रेल्वे मार्गांवर प्रवाशांचा खोळंबा होणार असल्यामुळं सुधारित वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं असं आवाहन रेल्वे विभागाकडून प्रवाशांना केलं जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक सुरू राहिल.
ब्लॉकच्या वेळांमध्ये (CSMT) सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या वेळेत सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढील स्थानकावर लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत गोरेगाव – बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे, तर अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हार्बर मार्ग
रविवारच्या मेगाब्लॉकचा सर्वाधिक परिणाम मध्य रेल्वेसमवेत हार्बर मार्गावरही दिसणार असून, कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल. सकाळी 11.10 ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक लागू असेल. ज्यादरम्यान सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीच्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात प्रवाशांसाठी सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी मार्गांवर मात्र विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करु शकतील असंही रेल्वे विभागानं सुचवलं आहे.