Samay Raina Video Controversey : यूट्यूबर आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन समय रैना याचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याच्या शोवर रणवीर अल्लाहबादीया याने केलेलं अश्लील वक्तव्यावर खूप टीका झाली होती. त्यानंतर रणवीरवर कारवाई देखील करण्यात आली. त्यानंतर समयने त्याच्या शोचे सर्व व्हिडीओ युट्यूबवरून डिलीट करून प्रेक्षकांची माफी मागितली. मात्र सध्या समय रैनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात समय अश्लील भाषेचा वापर करताना दिसतोय. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या नेटकाऱ्याने हा व्हिडीओ समयने प्रेक्षकांची माफी मागितल्या नंतरचा असल्याचे म्हटले आहे. परंतु यामागचं नेमकं सत्य काय याचा आम्ही फॅक्ट चेक केला आहे.
एका एक्स अकाउंटवर Piyush Raval या यूजरने 11 फेब्रुवारी 2025 रोजी हा व्हिडीओ पोस्ट केला. याला त्याने कॅप्शन दिले की, 'इंडियाज गॉट लेटेंट वादानंतर समय रैनाने माफीचा व्हिडिओ जारी केला आहे'. या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांची माफी मागताना समयने अभद्र आणि अश्लील भाषेचा प्रयोग केला. ज्यामुळे नेटकरी व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले. हा व्हिडीओ पाहून अनेकजण संतापले आणि समयला इंडियाज गॉट लेटेंट शोबाबत झालेल्या वादाबाबत कोणताही पश्चाताप नाही असं कमेंट करत म्हणू लागले. परंतु झी 24 तासने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ 2023 चा असल्याचे समोर आलं आहे. या व्हिडीओचा आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' शो बाबत सुरु असलेल्या वादाचा काहीही संबंध नाही.
Samay Raina issues apology video after India Got Latent controversy pic.twitter.com/Hmf7hT9ZXC
— Piyush Raval (Piyush_4269) February 11, 2025
समय रैनाचा व्हायरल होणारा सदर व्हिडीओ हा गुगल लेन्सवर सर्च केल्यावर समोर आलं की हा व्हिडीओ 2023 चा आहे. काही युट्युब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला असून याच्या खाली लिहिलेल्या डिस्क्रिप्शननुसार करम एल्बम लॉन्च पार्टी दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या पार्टी दरम्यान समय रैना रोस्ट करत होता. मात्र त्यातला केवळ काही भागांची व्हिडीओ क्लिप एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. 2023 ते 2024 दरम्यान व्हायरल होणार हा व्हिडीओ मिम म्हणून सुद्धा व्हायरल केला जायचा. त्यामुळे झी 24 तासने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये एक्स अकाउंट Piyush Raval वरून व्हायरल केला जाणारा हा व्हिडीओ जुना असून त्याचा सध्या सुरु असलेल्या इंडियाज गॉट लेटेंट शोच्या वादाशी कोणताही संबंध नाही हे समोर आलंय.
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लँटेंटमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या गदारोळ माजला होता. सर्व स्तरातून रणवीरसह समय रैनावर जोरदार टीका केली जात होती. तेव्हा 12 फेब्रुवारी रोजी समय रैनाने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करून माफी मागितली आणि व्हिडीओ डिलीट केले. त्याने माफी मागताना म्हटले की, "जे काही सुरु आहे ते हाताळणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी माझ्या चॅनेलवरुन इंडियाज गॉट लेटंटचे सर्व व्हिडीओ हटवले आहेत. माझा एकमेव हेतू फक्त लोकांना हसवणं आणि चांगला वेळ देणं आहे. सर्व तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी सर्व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करेन".