वाल्मिकच्या 'बी' टीमची परळीत दहशत, तुरुंगात असतानाही....; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

गजाआड असलेल्या वाल्मिकलादेखील बी टीम मदत करतीय का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2025, 08:46 PM IST
वाल्मिकच्या 'बी' टीमची परळीत दहशत, तुरुंगात असतानाही....; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा title=

बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगाची हवा खात आहे. पण तुरुंगात बसून वाल्मिक बीडमध्ये आपली दहशत पसरवतोय की काय असा प्रश्न पडत आहे. कारण वाल्मिक तुरुंगात असला तरी वाल्मिकची बी टीम सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा धनंजय देशमुखांनी केला आहे. गजाआड असलेल्या वाल्मिकलादेखील बी टीम मदत करतीय का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्याची परळीतली दहशत कमी झाली नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. वाल्मिक कराडचे अनेक साथीदार मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला आहे. वाल्मिक कराडची बी टीम दहशत निर्माण करत असून तारखेवेळी आरोपीचं मनोबल वाढवण्याचं काम ते करत असल्याचा आरोप झाला आहे. धनंजय देशमुखांनी तर त्या संशयितांची नावंच घेतली आहेत.

वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या आरोपींना मोकाट का सोडलं आहे? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.  वाल्मिकची बी टीम सक्रिय आहे या टीमला रोखावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

वाल्मिक कराडचं गुन्हेगारी साम्राज्य ठप्प झाल्याचा दावा करण्यात येतो, तो दावाच इथं फोल ठरला आहे. वाल्मिकचं मनोबल तोडलं नाही तर परळीतली गुन्हेगारी थांबणार नाही. वाल्मिक बाहेर आला किंवा आला नाही तरी परळीत गुन्हेगारी कायम राहिल आणि निष्पापांचे खून होत राहतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी त्यांना दिवसा त्यांच्या स्वत:च्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची विचारपूस आणि लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, त्यात गैर काय? असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे.

सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट आपणच घडवून आणल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या या भेटीवर मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केलीये. सुरेश धसांनी दगा केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सुरेश धसांनी मुंडेंच्या घेतलेल्या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलंय. सुरेश धसांनी बीडच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. सुरेश धसांनी जे केलंय ती राजकीय सेटिंग असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी या प्रकरणात सावध भूमिका घेतलीये.

सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेतल्याचा आरोप होऊ लागलाय. पुढच्या काळात सुरेश धस वाल्मिक कराडवरही बोलणं बंद करतील तर त्यात नवल वाटणार नाही अशी चर्चा होऊ लागलीये.