कोक्राझार जिल्ह्याच्या उपायुक्त वर्णाली डेका यांच्यासंबंधीच्या पोस्टवरील कमेंटवर हसणं एका व्यक्तीला फार महागात पडलं. वर्णाली डेका यांनी मेकअप न केलेली एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. अमित चक्रवर्तीने फेसबुकवर केलेल्या कमेंटला 'हसणारा इमोजी' टाकत प्रतिक्रिया दिली. यानंतर वर्णाली डेका यांनी तक्रार दाखल केली. ज्यानंतर अमित चक्रवर्तीला त्याच्या गावापासून 273 किमी अंतरावर असलेल्या कोक्राझार येथील न्यायालयात बोलावण्यात आलं. तिने मेकअपवरुन खिल्ली उडवल्याने टीका करणाऱ्या व्यक्तीसह इतर दोन पुरुषांवर सायबर-स्टॉकिंग आणि लैंगिक अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा आरोप केला आहे.
वर्णाली डेका यांनी आपला एक फोटो फेसबुकला शेअर केला होता. त्यावर नरेश बरुआ नावाच्या एका व्यक्तीने 'आज मेकअप नाही, मॅडम?' अशी कमेंट केली. अमित चक्रवर्तीने त्या कमेंटवर हसणारी इमोजी लावत प्रतिक्रिया दिली होती. नरेश बरुआच्या पोस्टवर वर्णाली डेका यांनी व्यक्त होत, 'नेमका तुझा प्रॉब्लेम काय?' अशी विचारणा केली.
त्या पोस्टनंतर वर्णाली डेका यांनी तक्रार दाखल केली. कोक्राझार पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चक्रवर्ती, बरुआ आणि अब्दुल सुबर चौधरी यांच्यावर आरोप करण्यात आले.
न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये डेका आणि तिन्ही आरोपींमधील संभाषणाचे स्क्रीनशॉट सादर करण्यात आले. एका पोस्टमध्ये त्यांनी चौधरींना इशारा दिला, "कृपया भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४D अंतर्गत सायबर स्टॉकिंगची माहिती घ्या. तुम्ही त्या अंतर्गत दोषी आहात आणि मी सायबर सेलकडे तक्रार दाखल करत आहे. तुम्ही मला सटॉक करण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवे होते".
दुसऱ्या एका पोस्टमध्ये यांनी चक्रवर्तीला उद्देशून लिहिलं की, "ही एक अपमानजनक आणि लैंगिक टिप्पणी आहे. कलम 354A मी तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करत आहे. तुम्ही मदत केल्याबद्दल दोषी आहात"
प्रसारमाध्मयांशी बोलताना चक्रवर्तीने सांगितलं की, "मी फक्त एका फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया दिली. फक्त हसल्याबद्दल, आज मला जामीन घ्यावा लागला. मला माहित नव्हतं की वर्णाली डेका आयएएस अधिकारी आहेत किंवा उपायुक्त. 23 जानेवारी रोजी कोक्राझार पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याने मला फोन करुन येण्यास सांगितलं. जेव्हा मी विचारलं 'मी कोणत्याही कारणाशिवाय का येईन?', तेव्हा त्यांनी मला तुमच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे असं सांगितलं".
"मी तपशील विचारला तेव्हा त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. त्यानंतर माझ्या वकील मित्राने मला या प्रकरणाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत केली. मला समजत नाही की एका आयएएस अधिकाऱ्याला इतक्या क्षुल्लक गोष्टीवर इतकी टोकाची कारवाई करण्यासाठी वेळ कसा मिळाला?," असं त्याने म्हटलं आहे.
"फक्त माझ्या प्रतिक्रियेसाठी, फेसबुकवरील एका हसणाऱ्या इमोजीसाठी, मला त्रास देण्यात आला आहे. मी फक्त नरेश बरुआच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली... मला या प्रकरणाबद्दल दुसरे काहीही आठवत नाही," असंही तो हतबलपणे म्हणाला.