शरद पवारांविरोधात अजिबात नाराजी नाही. शरद पवारांविरोधात नाराजी असण्याचं कारण काय? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरती आमची भूमिका मांडली, आम्ही टीका केली नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देताना संजय राऊतांनी शिंदे गटातील नेत्यांना सुनावलं. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्रात ज्यांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे, ज्यांनी बेईमानी करुन अमित शाहांशी हातमिळवणी करुन सरकार पाडलं, त्यांचा सत्कार करणं हा पवार साहेबांचा अपमान आहे. महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणं हा महादजी यांचा अपमान आहे अशी आमची भूमिका आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
"शिंदे गटातील जे लोक माझ्यावरती टीका करत आहेत त्यांना माझे आणि पवार साहेबांचे संबंध माहित नाहीत. ते आमच्या पितासमान आहेत. मी माझ्या पक्षाची एक भूमिका मांडली. शिंदे गटाचे लोक तोंडाची डबडी वाजवत आहेत. मी शरद पवारांवर टीका केली नाही, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली हे त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणातील धडे घ्यावे. ज्यांना पवारांचा पुळका आला आहे तो किती खोटा आहे. अमित शाह, मोदी महाराष्ट्रात येतात आणि शरद पवार यांच्यावर टीका करतात तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद होती? तेव्हा पवाराांचा अपमान झाला नाही का?," अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
"दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, उदय सामंत, नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतात तेव्हा यांच्या तोंडाला बुच बसला होता का? तेव्हा त्यांची अस्मिता, शरद पवार प्रेम जागं झालं नाही का? किती घाणेरड्या शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे शेपट्या घालून बिळात का लपले होते? गांडुगिरी का करत होते?," असा संताप त्यांनी व्यक्त केला.
"मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. आम्हाला हे मान्य नाही की एका गद्दाराला ज्याने शरद पवार यांचाही पक्ष फोडला, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं. मी जी भूमिका मांडली ती शरद पवारांचीही भूमिका असायला पाहिजे. एकनाथ शिंदे हा माणूस अमित शाहांसोबत हातमिळवमणी करुन पक्ष फोडतो. अमित शाह यांनी पक्ष फोडले आहेत आणि तुम्ही त्यांची भलावण करत आहात. मी बोललो कारण माझ्यात हिंमत आहे. तुम्ही अमित शहा यांच्याविषयी काय बोलत आहात का त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतात तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही," असंही त्यांनी सुनावलं.
पुढे ते म्हणाले की, "हे भंपक लोक आहेत. घाणेरडं राजकारण करणार लोक आहेत. हे दुतोंडी गांडूळ आहेत. एकनाथ शिंदे यांना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं आमचं काही म्हणणं नाही. माझा आक्षेप इतकाच आहे की, महादेवजी शिंदे हा एक शूर योद्दा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत. दिल्लीपुढे झुकला नाही त्याच्या नावे एक खासगी संस्था पुरस्कार देते. हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे. शरद पवार यांनी तिकडे जाणं हे महाराष्ट्राला रुचलं नाही, त्यांच्या पक्षातल्या लोकांना देखील रुचल नाही".
"शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला की मान मिळतो. मोदी, शाह यांनी त्यांना भारतरत्न द्यावा आम्ही काय म्हणणार, फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण द्यावा माझं काही म्हणणं नाही. महादेवजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीच तख्त तलवारीच्या, स्वाभिमानाच्या जोरावर ठेवलं त्यांच्या नावे दिल्लीपुढे झढुकणाऱ्यांना, गद्दारी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जात आहे," अशी टीका त्यांनी केली.