'न सांगता मी स्मिताच्या कानाखाली मारली', अमोल पालेकर म्हणाले, 'नंतर तिच्या चेहऱ्यावर...'

Actor Slaps Actress Without Her Consent: हा सारा घटनाक्रम या अभिनेत्यानेच एका जाहीर कार्यक्रमातील मुलाखतीत सांगितला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 14, 2025, 04:23 PM IST
'न सांगता मी स्मिताच्या कानाखाली मारली', अमोल पालेकर म्हणाले, 'नंतर तिच्या चेहऱ्यावर...' title=
मुलाखतीत सांगितला किस्सा

Actor Slaps Actress Without Her Consent: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी काही दिवसांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टीव्हल 2025 ला हजेरी लावली होती. या वेळी मुलाखतीमध्ये बोलताना पालेकर यांनी त्यांची सहकलाकार स्मिता पाटील यांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. श्याम बेनेगल यांच्या भूमिका चित्रपटाच्या वेळी सेटवर घडलेला किस्सा पालेकरांनी सांगितला. 

प्रश्न काय होता?

एकदा स्मिता पाटील यांची पूर्वपरवानगी न घेता मी शुटींगदरम्यान त्यांच्या कानाखाली लगावली होती. या प्रकारानंतर आपण स्मिताची माफी मागितली होती असंही पालेकर म्हणाले. पालेकरांना त्यांच्या रंगभूमी विषयक अभिनयामुळे आणि अनुभवामुळे स्मिता पाटील यांच्या कानाखाली मारताना सीन शूट करताना फायदा झाला का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर त्यांनी आपण याच्याशी काही अंशी सहमत असल्याचं म्हटलं. सराव न करता शुटींग करणं आपल्याला आवडत नाही. आपण आपल्या सहकाऱ्यासोबत बरीच चर्चा करतो असं पालेकरांनी सांगितलं. 

मला त्यांनी सांगितलं तिच्या कानाखाली मार

"आम्ही 'भूमिका' चित्रपटाचं शुटींग करत असताना त्यातील महत्त्वाच्या सीनवर काम करत होतो. मात्र श्याम हे त्यावर सामाधानी नव्हते. सीन शूट होण्याआधीच त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, "अमोल तिच्या कानाखाली मार" मी त्यावर लगेच होकार दिला. मात्र याचा स्मिताबरोबर सराव केला पाहिजे असं मी म्हणालो. मात्र श्याम यांनी सरावाला नकार दिला. तिला काहीच न कळू देता अचानक तिच्या कानाखाली मार. मी लगेच याला नकार दिला. मात्र त्यांनी आग्रह कायम ठेवला. त्यांनी माझा हा आदेश आहे, असं सांगितलं होतं," अशी माहिती दिली.

... अन् दोघेही रडू लागलो

हा सीन शूट झाल्यानंतर पालेकर आणि स्मिता दोघेही रडत होते. हे सुद्धा पालेकरांनी स्वत: सांगितलं. "शुटींग सुरु झालं तेव्हा मी गोंधळलेला होतो. मला भीती वाटत होती. मी स्मिताला न सांगता कानाखाली मारावी की नाही याबद्दल संभ्रमावस्थेत होतो. कारण हे असं करणं माझ्या स्वभावाला शोभणारं आणि मनाला पटणारं नव्हतं. स्मिता उत्तम अभिनय करत होती आणि सीन शुटींगला सुरुवात झाली. एक क्षण असा आला की मी तिचा हात पकडला आणि तिला कानाखाली मारली. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव हे जे काही घडलं त्यावर विश्वास बसत नाही असे होते. तिच्या चेहऱ्यावर अपमान आणि संताप एकाच वेळी दिसत होता. मात्र आम्ही दोघे प्रोफेश्नल अभिनेते असल्याने शुटींग सुरु ठेवलं कारण श्याम यांनी 'कट' असं म्हटलं नव्हतं. सीन शूट करुन झाल्यानंतर मी तिच्याजवळ गेलो आणि तिची माफी मागितली. मी रडू लागलो. मी हे असं का केलं तिला सांगितलं. तिने मला मिठी मारली आणि ती सुद्धा रडू लागली," असं पालेकर म्हणाले. 

कधी प्रदर्शित झालेला हा चित्रपट?

'भूमिका' हा चित्रपट 1977 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटामध्ये स्मिता पाटील, अमोल पालेकरांबरोबरच अनंत नाग, नसिरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी हे कलाकार होते.