Google Chrome Warning: गुगल क्रोम युजर्ससाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. कारण भारत सरकारने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. भारत सरकारशी संबंधित एजन्सी असलेल्या कॉम्प्युटर आपत्कालीन एमर्जन्सी टीमने गुगल क्रोम वापरणाऱ्या यूजर्ससाठी मोठा इशारा जाहीर केला आहे. तुम्ही गुगल क्रोम इंटरनेट ब्राउझर वापरत असाल तर तुम्ही सावध असले पाहिजे. हा इशारा विशेषतः विंडोज किंवा मॅकओएसवर या लोकप्रिय ब्राउझरचा वापर करणाऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे.
कोणते उपकरण वापरणाऱ्या गुगल क्रोम वापरकर्त्यांनी काळजी घ्यायला हवी? कोणत्या त्रुटींमुळे ते धोक्यात आहे? यासंदर्भात CERT-In ने त्यांच्या बुलेटिनमध्ये माहिती दिली आहे. स्किया, V8 मध्ये एक्सटेंशन API च्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे आणि फ्रीच्या वापरामुळे गुगल क्रोममधील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटींचा फायदा हल्लेखोर आणि घोटाळेबाज घेऊ शकतात, असेही यात म्हटलंय.
क्रोम ब्राउझरमधील सध्याच्या कमतरता ब्राउझरच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांमध्ये आढळतात. त्यामुळेच यूजर्सना त्यांचा त्रास सहन करावा लागू शकतो, असं एजन्सीने म्हटलंय. सध्याच्या त्रुटींमुळे रिमोट हल्ला करणारे हल्लेखोर युजर्सवर दूरवरून लक्ष्य करू शकतात. असे करण्यासाठी त्याला डिव्हाइसवर भौतिक प्रवेशाची देखील आवश्यकता नसेल, असेही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पेजर हल्ला घडवून आणल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. यानंतर हल्ला करण्यासाठी काहीही अशक्य नाही, हे जगाला कळालं. तुमच्या डिव्हाइसला स्पर्श न करताही ते खास डिझाइन केलेल्या वेबपेजचा वापर करून हॅक केले जाऊ शकते. यानंतर तुमचा वैयक्तिक डेटा चोरणे, तुमची ओळख चोरणे आणि इतर घोटाळे करून तुमचे खाते रिकामे करणे यासारख्या कारवाया देखील केल्या जाऊ शकतात.
ब्राउझर आपोआप नवीन अपडेट देत असतो. पण जर तुम्ही बऱ्याच काळापासून क्रोम अपडेट केले नसेल तर ते त्वरित करा. तुमच्या ब्राउझरला अपडेट आले नसेल तर तुम्हाला दुरुस्तीसाठी वाट पहावी लागेल. Linux वर 133.0.6943.53 पेक्षा जुने आणि Windows किंवा Mac वर 133.0.6943.53/54 पेक्षा जुने क्रोम वर्जन रिस्क कॅटेगरीमध्ये येतात.