बीसीसीआयने परदेश दौऱ्यात जाताना खेळाडू सोबत नेणाऱ्या सामानाच्या वजनावर निर्बंध आणले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीयआने अनेक नवे नियम लागू केले असून, त्यामध्ये सोबत नेल्या जाणाऱ्या सामानाचाही उल्लेख आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, खेळाडू आता आपल्यासोबत फक्त 150 किलोपर्यंत सामान नेऊ शकतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर बीसीसीआय पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियम आखले आहेत.
'दैनिक जागरण'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, काही खेळाडून बोर्डाच्या दिलेल्या सवलतीचा फायदा घेत आहेत. रिपोर्टनुसार एका खेळाडूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बीसीसीआयला 27 बॅगांसाठी पैसे भरायला लावले. या बॅग फक्त खेळाडूच्या नव्हत्या तर त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि पर्सनल स्टाफच्याही होत्या. या सर्व बॅगचं वजन 250 किलो भरलं, ज्यासाठी बीसीसीआयला पैसे भरायला लावले.
या बॅगमध्ये एकूण 17 बॅट होत्या. याशिवाय कुटुंबातील सदस्य आणि पर्सनल स्टाफशी संबंधित सामान होतं. बीसीसीआयच्या नियमानुसार, खेळाडूच्या कुटुंबाचे आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे सामान वेगळे वाहून नेणं अपेक्षित आहे. परंतु, खेळाडूने आपल्या सामानाचा भाग म्हणून बीसीसीआयला ते सर्व मॅनेज करण्यास भाग पाडले.
रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, या खेळाडूचे कुटुंबीय संपूर्ण दौऱ्यादरम्यान त्याच्याबरोबर होते. यामुळे बीसीसीयला त्यांचा फक्त ऑस्ट्रेलियाला जातानाचाच नाही तर तिथून भारतात येतानाचा खर्चही उचलावा लागला. तसंच मालिकेदरम्यान एका शहरातून दुसऱ्या शहरात जातानाही सामान न्यावं लागत होतं. बोर्डाने या सर्व प्रक्रियेत नेमके किती पैसे खर्च केले हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण ही रक्कम काही लाखांमध्ये असू शकते.
वरिष्ठ खेळाडूच्या या वर्तनामुळे संघातील इतर सदस्यांवर चुकीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. यामुळे बीसीसीआयने आता नियमात बदल केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये बरंच काही बदललं आहे. आता खेळाडूंना सामन्यांसाठी टीम बसमधून प्रवास करावा लागत आहे. टीम प्रवासाच्या बाबतीत कोणत्याही खेळाडूला वैयक्तिक व्यवस्था करण्याची परवानगी दिली जात नाही.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ दुबईला जाण्याच्या तयारीत असताना, बीसीसीआयनेही एक कडक आदेश जारी केला आहे, ज्यामुळे खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ खेळाडूने या प्रकरणात समजूतदारपणाची मागणी केली होती कारण तो त्याच्या पत्नीला मालिकेसाठी दुबईला घेऊन जाऊ इच्छित होता. पण बोर्डाने सर्वांना नियम सारखे असतील असं सांगितलं आहे.