मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई: तुम्ही क्रिकेट खेळत आहात ? त्यातील विविध अंगांचा अभ्यासही आहे? मग आता क्रिकेटचा अभ्यास करून तुम्हाला पदवीधर होता येणार आहे. मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. त्यासाठी अनेक क्षेत्रांतून मदत मिळत असते. मैदानाची निगा, तसेच खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींमध्ये या अभ्यासक्रमाद्वारे प्रावीण्य मिळवता येईल. यात क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष मैदानावर शिकण्याचा अनुभव मिळेल. खेळताना त्यांना विविध विषयांत व्यावसायिक कौशल्य मिळवता येईल. त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक पात्रताही मिळेल', असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी 'झी 24 तास'ला सांगितलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट नॉलेज सेंटर चालवण्यात येते. क्युरेटर, स्कोरर, अंपायर याचा एक भाग आहे. खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध अभ्यासक्रमाचा समावेश आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई युनिव्हर्सिटीसोबत एकत्र येऊन ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम चालवला जाणार आहे. मुंबई विद्यापीठात हायब्रीड प्रोग्रॅम आहेत. चांगल्या नोकरीसाठी ग्रॅज्युएशन महत्त्वाचा आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाची प्रायमरी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक खेळाच्या संदर्भात अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात आहेत. त्याच्याशीच आम्हाला संलग्न व्हायचे आहे. माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यावर काम करत आहेत. सगळ्यांची मदत घेऊन हा प्रोग्राम यशस्वीपणे राबवू, असे एमसीए अध्यक्षांनी सांगितले.
या अभ्यासक्रमात प्रवेश घेणारा विद्यार्खी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असावा. त्याने अंडर 19, 23 वर्षाखाली खेळले पाहिजे. हे लक्ष्य ठेवून हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या टेक्निक शिकवणारे हे हायब्रीड मॉडेल आहे.