बळजबरीने अनैसर्गिक S*x करताना पत्नीचा मृत्यू; तरीही कोर्टाने पतीला निर्दोष सोडलं कारण...

High Court On Unnatural Sex Women Death Case: या प्रकरणामधील आरोपीला 2017 साली अटक करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 14, 2025, 11:51 AM IST
बळजबरीने अनैसर्गिक S*x करताना पत्नीचा मृत्यू; तरीही कोर्टाने पतीला निर्दोष सोडलं कारण... title=
2017 च्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल (प्रातिनिधिक फोटो)

High Court On Unnatural Sex Women Death Case: लैंगिक संबंध ठेवणे किंवा त्यासंदर्भात पतीने केलेली कोणतीही कृती, 'गुन्हा ठरत नाही अगदी त्यासाठी बळजबरी केली असेल तरी,' असं छत्तीसगडमधील उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटलं आहे. एकल खंडपीठाने दिलेल्या निकालामध्ये न्यायालयाने ही टीप्पणी केली आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने इच्छा नसताना पतीने अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण 2017 मधील आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीने अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवताना ही महिला गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पत्नीने मृत्यूपूर्वी नोंदवलेला जबाब

मृत्यूपूर्वी नोंदवलेल्या जबाबामध्ये या महिलेने पतीने बळजबरीने आपल्याबरोबर अनैसर्गिक संभोग केला, असं म्हटलं होतं. पेरिटोनिटिस आणि गुदाशयाला छिद्र पडल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं. गुदद्वारेच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचा संसर्ग झाल्यास पोटामध्ये किंवा बेंबीजवळ अंतर्गत भागात सूज येण्याच्या प्रकाराला पेरिटोनिटिस म्हणतात.

न्यायालयाने निकाल देताना काय म्हटलं?

एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती कुमार व्यास यांनी, लैंगिक संबंध ठेवताना अथवा अनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीची सहमती घेणे फारसं महत्त्वाचं नसल्याचं म्हटलं आहे, असं 'लाइव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. "एखाद्या स्रीचं वय 15 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तिच्या पतीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले अथवा संभोग केला तर त्याला या परिस्थितीमध्ये बलात्कार म्हणता येणार नाही. तसेच अनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीची सहमती गरजेची नाही. त्यामुळेच या प्रकरणामध्ये कलम 376 आणि 377 अंतर्गत कारवाई करता येणार नाही, असं न्यायालयाचं मत आहे," असं न्यायमूर्तींनी म्हटलं. 

नक्की पाहा >> चड्डी-बनिया अन् हातात दारु... माजी CM च्या निकटवर्तीयाचा Video भाजपाने केला शेअर

अशा अनैसर्गिक शरीरसंबंधांना गुन्हा म्हणता येणार नाही

वैवाहिक बलात्कार हा भारतामध्ये कायद्याने गुन्हा नाही. महिलेचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले तरच वैवाहिक महिलेसोबत बलात्कार झाला असं कायदा सांगतो. त्यामुळेच अनैसर्गिक शरीरसंबंधांना इथे गुन्हा म्हणता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

आरोपीला सोडून दिलं

या प्रकरणामध्ये आरोपी पतीला सुनावण्यात आलेली 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा रद्द करुन त्याला दोषमुक्त करत सोडून देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हा निकाल 19 नोव्हेंबर 2024 ला दिला आणि त्याची घोषणा 10 फेब्रुवारी रोजी दिली. 

कधी झालेली अटक?

या प्रकरणातील आरोपीला बस्तर जिल्ह्यातील जगदळपूर येथून 11 डिसेंबर 2017 रोजी अटक करण्यात आली होती. मृत्यूपूर्वी या व्यक्तीच्या पत्नीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आलेली. या महिलाचा मृत्यूही 11 डिसेंबर 2017 रोजी उपचारांदरम्यान झाला.